यावर्षी प्रथमच वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्यावतीने दोन एअर ॲम्बुलन्सची सुविधा
वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यास नगर विकास, राज्य परिवहन व आरोग्य विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही
वारी काळात प्रशासनाने स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे,पंढरपूर शहरातील रस्त्यातील खड्डे त्वरित बुजवून घ्यावेत
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१९ जुलै : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने पांडुरंगाचा वारकरी समाधानी होईल अशा पद्धतीच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून द्याव्यात. ही वारी सुरक्षित आणि निर्मळ ठरेल यासाठी सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेऊन सांघिक कामाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करून वारी यशस्वी करावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शासकीय विश्रामगृह सभागृहात आषाढी वारी अनुषंगाने आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत,आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजेंद्र खरे,आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिती भालके,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर,मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.दर्शन रांग,वाळवंट, भक्ती सागर आणि चंद्रभागा नदी पात्रातील स्वच्छतेची पाहणी केली, त्यावेळी आणखी स्वच्छता नियमितपणे होणे आवश्यक असून, सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी.श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी आपण दिलेल्या सोयी सुविधामुळे तसेच स्वच्छतेमुळे येथून समाधानी होऊन गेला पाहिजे यादृष्टीने यंत्रणेने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पालखी मार्ग तसेच पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.त्यामुळे या वर्षाची वारीही आरोग्यदायी ठरेल तसेच ती सुरक्षित आणि निर्मळ होईल या दृष्टीने अधिक गतीने काम करावे. यावर्षी प्रथमच आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास एअर ॲम्बुलन्सची सुविधा निर्माण केली आहे.आजपासून वीज वितरण कंपनीने वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून लोडशेडिंग बंद करून वारी होई पर्यंत नियमित वीज पुरवठा राहील याची दक्षता घ्यावी असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देशित केले.
वारकऱ्यांना सुविधा देण्याबरोबरच वारकरी हा खरा व्हीआयपी असून त्यांना लवकर दर्शन मिळण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंदच ठेवावे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत वारकऱ्यांसाठी आणखी सुविधा आवश्यक असतील तर नगर विकास विभाग आरोग्य विभाग तसेच राज्य परिवहन विभागाच्यावतीने निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी म्हटले.
पंढरपूर नगरपरिषदेला मलनिःसारण, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास,स्कायवॉक व दर्शन मंडप तसेच शहरातील अन्य कामासाठी एकूण 671 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंढरपूर शहरातील वाहतूक व नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा लवकरच निर्माण करण्यात येईल तसेच मंदिर समितीला एक रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली आहे ती उद्या मिळणार आहे असे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच नगरपरिषदेने पंढरपूर शहरा तील रस्त्यावरील खड्डे आरएमसी तंत्रज्ञान वापरून दोन दिवसात बुजवून घ्यावेत,असे निर्देश श्री.शिंदे यांनी दिले.
जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपलब्ध केलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शाम कुंभार, गट विकास अधिकारी अमोल जाधव आणि मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी आषाढी वारीत आपापल्या विभागाने केलेल्या कामाची माहिती बैठकीत सादर केली.
आषाढी वारी 2026 च्या तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आढावा घेतला. वारकरी हाच VIP असल्याने व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय, प्रथमच दोन एअर ॲम्बुलन्सची सुविधा, लोडशेडिंग बंद, स्वच्छता मोहिमेला प्राधान्य, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश व वारकऱ्यांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची घोषणा.











Add Comment