कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सोहेल काझीची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर पॅनेलवर निवड
खेळाडू ते अंपायर! सोहेल काझीने गाठला क्रिकेट कारकिर्दीतील नवा टप्पा; MCA अंपायर परीक्षेत यश
पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील एम. कॉम.भाग-२चा विद्यार्थी सोहेल काझी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर परीक्षेत यशस्वी; अंपायर पॅनेलवर निवड
Pandhapur sports news : पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सोहेल काझी याने नवा आदर्श निर्माण केला आहे.रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील एम.कॉम. भाग–२चा विद्यार्थी सोहेल काझी याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अंपायर परीक्षेत यश संपादन केले असून त्याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर पॅनेलवर निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून अंपायर पॅनेलसाठी निर्धारित परीक्षा घेतली जाते.या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या अंपायर्सना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रिकेट सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम करण्याची संधी मिळते. सोहेल काझीने ही महत्त्वपूर्ण परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत आपल्या क्रीडा कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
खेळाडू ते अंपायर; मैदानावरील नवी जबाबदारी
सोहेलने यापूर्वी खेळाडू म्हणून क्रिकेटच्या मैदानावर आपले योगदान दिले आहे. आता अंपायर म्हणून मैदानावर निर्णय देण्याची नवी आणि तितकीच जबाबदारीची भूमिका त्याच्यावर आली आहे. क्रिकेटमध्ये अंपायरचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात.नियमांचे सखोल ज्ञान,प्रसंगावधान, तटस्थता आणि अचूक निर्णयक्षमता या गुणांची या भूमिकेसाठी आवश्यकता असते.
ही परीक्षा उत्तीर्ण करून सोहेलने क्रिकेटच्या मैदानावरील आपल्या वाटचालीला नवे वळण दिले आहे. त्याच्या या यशामुळे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाविद्यालय परिवाराकडून अभिनंदन
सोहेल काझीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव, सर्व विभागांचे उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, जिमखाना विभागप्रमुख प्रा.अनिल परमार, प्रा.विठ्ठल फुले,प्रा.मनोज खपाले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले.
त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी महाविद्यालय परिवाराने शुभेच्छा व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांना नवनवीन संधींसाठी प्रोत्साहन
यावेळी प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्याची महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली.शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थ्यांनी नवनवीन संधी मिळवाव्यात, यासाठी महाविद्यालय सदैव प्रोत्साहन देत राहील,असे त्यांनी सांगितले.
सोहेल काझीच्या निवडीमुळे महाविद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत असल्याचे या यशातून अधोरेखित झाले असून, सोहेलच्या पुढील अंपायरिंग कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.











Add Comment