Maharashtra Politics

डीपीपासून शेतीपंपांच्या ८ तास वीजपुरवठ्या पर्यंत…आमदार समाधान आवताडेंनी मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कार्यवाहीचे आदेश

शेतीपंपांना ८ तास वीज,नवीन डीपी,वाड्या- वस्त्यां वरील वीज पुरवठा आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांवर आमदार समाधान आवताडे आक्रमक; शेतीपंपांना दररोज ८ तास वीज पुरवठ्याची मागणी

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील वीज समस्यांवर आमदार समाधान आवताडे आक्रमक.शेतीपंपांना दररोज ८ तास वीज,नवीन डीपीची तपासणी,वाड्या-वस्त्यांना गावठाणा प्रमाणे वीजपुरवठ्याची मागणी.

  • डीपीपासून वाड्या-वस्त्यांवरील वीजपुरवठ्यापर्यंत विविध प्रश्नांवर प्रशासनाचे वेधले लक्ष; जिल्हाधिकाऱ्यां कडून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश

पंढरपूर-मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ सप्टेंबर २०२६ : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या विविध वीजविषयक प्रश्नांवर आमदार समाधान आवताडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधत त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित वीज प्रश्न प्रशासनासमोर मांडले. या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या,नवीन डीपी बसविताना होणाऱ्या अडचणी आणि शेतीपंपांना अपुरा वीजपुरवठा या प्रश्नांकडे आमदार आवताडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

वाड्या-वस्त्यांना गावठाणाप्रमाणे वीजपुरवठ्याची मागणी

मतदारसंघातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना गावठाणा प्रमाणे सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना वीजपुरवठ्यासाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित यंत्रणेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

नवीन डीपी बसविताना तपासणी आवश्यक

नवीन डीपी बसविताना त्याची योग्य प्रकारे तपासणी करूनच तो कार्यान्वित करावा, अशी स्पष्ट सूचना आमदार समाधान आवताडे यांनी केली.

फिल्टर युनिटवरून डीपी बसविल्यानंतर त्याला लागू असलेल्या एक वर्षाच्या वारंटी कालावधीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. डीपीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास वारंटीच्या कालावधीत संबंधित यंत्रणेकडून आवश्यक दुरुस्ती करून घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

घरगुती,व्यावसायिक वीज जोडणीसाठी अनावश्यक त्रास नको

एनएससी योजनेअंतर्गत घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना वीज जोडणी उपलब्ध करून देताना शेतकरी आणि नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली.

वीज जोडणीसाठी आवश्यक असलेल्या सेवांमध्ये नागरिकांना विनाकारण अडवणूक किंवा त्रास होऊ नये. शेतकऱ्यांना आवश्यक सेवा विनाशुल्क उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी प्रशासनासमोर मांडली.

शेतीपंपांना दररोज ८ तास वीज द्या

सध्या शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पिकांना वेळेवर पाणी देणे आवश्यक असताना वीज पुरवठ्याची अनियमितता शेतीच्या नियोजनावर परिणाम करत असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

शेतीपंपांना दररोज आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा सुरळीत झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणीची दखल

आमदार समाधान आवताडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित मूलभूत प्रश्न मार्गी लागण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. विशेषतः शेतीपंपांचा वीजपुरवठा, नवीन डीपीची कार्यक्षमता आणि वाड्या-वस्त्यां वरील वीजपुरवठा या प्रश्नांवर आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आमदार समाधान आवताडे यांच्या या पाठपुराव्यामुळे वीजविषयक प्रश्नांना प्रशासकीय पातळीवर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.