२४ वर्षे देशासाठी उभा राहिला… वर्दीचा सन्मान… तिरंग्याचा अभिमान, हवालदार विक्रम नाईकनवरे यांच्या मायभूमीत परतण्याचा क्षण ठरला भावूक
पंढरपूरचे सुपुत्र हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा २४ वर्षांच्या देशसेवेनंतर मायभूमीत भव्य सत्कार.रॅलीतून देशभक्तीचा जल्लोष;युवकांनी सैन्यात दाखल व्हावे,प्रत्येक घरात सैनिक घडावा, असे आवाहन
२४ वर्षे देशसेवा करून मायभूमीत परतले हवालदार विक्रम नाईकनवरे; पंढरपुरात भव्य रॅलीतून वीर सुपुत्राचा गौरव
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ सप्टेंबर २०२६ –सीमेवर जवान देशाचे रक्षण करतो, पण त्याच्या मागे उभे राहणारे कुटुंब,नातेवाईक आणि मित्रपरिवारही तितकाच मोठा त्याग करत असतो.याच त्यागाची जाणीव करून देणारा भावूक क्षण पंढरपुरात अनुभवायला मिळाला. तब्बल २४ वर्षे ३० दिवस देशसेवा करून भारतीय सैन्यातून सन्मानपूर्वक निवृत्त झालेले पंढरपूरचे सुपुत्र हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे मायभूमीत परतले आणि पंढरपूरकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत देशसेवेला मानवंदना दिली.
६ सप्टेंबर रोजी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत नागरिक, तरुण, माजी सैनिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मात्र या रॅलीतील सर्वात मोठा संदेश होता देशासाठी आयुष्य देणाऱ्या सैनिकाला समाज विसरत नाही.
पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून स्टेशन रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक,भक्ती मार्ग परिसरातून रॅली काढण्यात आली.त्यानंतर गाडगेबाबा चौकातील विराट मंगल कार्यालयात हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा मान्यवर, माजी सैनिक,नागरिक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
वर्दी उतरली; पण देशसेवेची भावना कायम
२ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय सैन्याच्या कोर ऑफ सिग्नल मध्ये दाखल झालेल्या विक्रम नाईकनवरे यांनी २४ वर्षे देशसेवा केली. पंजाब, हिमाचल प्रदेश, गोवा यांसह विविध ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी केवळ सैनिक म्हणूनच नव्हे, तर पुढील पिढीतील जवान घडविणारा प्रशिक्षक म्हणूनही योगदान दिले.ड्रिल इन्स्ट्रक्टर, डब्ल्यू.टी. उस्ताद तसेच रिक्रूट, अग्निवीर आणि ज्युनिअर लीडर ऑफिसर यांच्या प्रशिक्षणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, देशसेवेच्या धावपळीतही त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मी सीमेवर होतो; माझे घर माझ्या माणसांनी सांभाळले
सत्काराला उत्तर देताना विक्रम नाईकनवरे भावूक झाले. देशसेवेच्या काळात आपण सीमेवर कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबाची आणि घराची जबाबदारी नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुण्यांनी सांभाळली. त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.मी देशसेवा करत असताना माझ्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी आणि परिवाराने माझ्या घराकडे लक्ष दिले. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीचे आशीर्वाद यामुळेच देशसेवेचे खडतर कर्तव्य पार पाडता आले, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे!
२४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या या सैनिकाने स्वतःसाठी नव्हे तर देशातील युवकांसाठी संदेश दिला. देशभरातील युवकांना माझे एक आव्हान आणि नम्र विनंती आहे – प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे. जय हिंद! हा संदेश उपस्थित तरुणांसाठी या सत्कार सोहळ्याची खरी भेट ठरला.
सैनिक सीमेवर उभा असतो म्हणून देश सुरक्षित असतो; पण सैनिकाच्या त्यागाची जाणीव समाजात जिवंत ठेवणे हीदेखील समाजाची जबाबदारी आहे, याची प्रचिती या सोहळ्याने दिली.
या गौरव सोहळ्याचे आयोजन त्यांचे बंधू देशपातळीवरील क्रिकेट अंपायर दीपक राजाराम नाईकनवरे,स्व.राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था, संतपेठ पंढरपूर तसेच पंढरपूर- मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली; मात्र २४ वर्षे तिरंग्याची शान जपणाऱ्या या सैनिकाला दिलेला पंढरपूरकरांचा सलाम कायमस्वरूपी नागरिकांच्या स्मरणात राहणार आहे.











Add Comment