आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज- मुख्याधिकारी महेश रोकडे
आषाढी यात्रा 2026: पंढरपूर नगरपालिका सज्ज; 2,500 कर्मचारी, 45 एमएलडी पाणीपुरवठा आणि 50 टँकरची व्यवस्था
आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये अभूतपूर्व तयारी; 18-20 लाख भाविकांसाठी स्वच्छता, पाणी, शौचालये व हिरकणी कक्ष सज्ज
पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० जुलै २०२६ : आषाढी शुद्ध एकादशी २५ जूलै २०२६ रोजी होणार असून आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे १८ ते २० लाख भाविक येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र,वाळवंट ,६५ एकर परिसर ,पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर,वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी तसेच सुरळीत पाणीपुरवठा , सुरक्षित विद्युत पुरवठा उपलब्ध राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून पंढरपूर नगरपालिका व जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासना मार्फत २५०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
प्रशासनामार्फत पाणीपुरवठ्याच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे. आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.नदी पात्र, वाळवंट परिसर,वाखरी पालखी तळ,भक्ती सागर ६५ एकर व इतर विविध ठिकाणी 12 हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्षाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्यात येणार आहेत.भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. दररोज 45 एमएलडी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असून त्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार आहे.वारी कालावधीत शहरात विविध ठिकाणी 50 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
शहरासह ६५ एकर,वाळवंट,पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे.घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या , कॉम्पॅक्टर,कंटेनर,घंटागाडी, जेसीबी,जेटींग आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा दोन वेळेस घरोघरीचा कचरा गोळा करतील. दररोज १०० ते १५० टन इतका कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रा काळात शहरातील व उपनगरातील सर्व मैदाने,नदी परिसर,६५ एकर, पत्राशेड ,दर्शनबारी रोजचे रोज स्वच्छ व निर्जंतुक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
यात्रेकरुंच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडुन ६५ एकर,नदी पात्र, पत्राशेड,मंदिर परिसर,वाखरी पालखी तळ आदी ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पत्राशेड, वाळवंट,६५ एकर परिसर, रेल्वे मैदान या ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार आहेत. तात्पुरत्या शौचालयाच्या ठिकाणी पाण्याच्या टिपा ठेऊन त्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक करण्यात आली असून जनजागृती देखील करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्या असून, अति धोकादायक वास्तू पाडल्या आहेत.शहरातील मुख्य रस्त्यावरील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.
वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यासह प्रदक्षिणा मार्ग,दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. तसेच नदीपात्रात व घाटावर अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नदीपात्रात हायमास्ट दिवे,घाटांवर एलईडी दिवे चालू करण्यात आले आहेत.सार्वजनिक शौचालयातही लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.पंढरपूर शहरात येणाऱ्या रस्त्यांवर प्रखर प्रकाश व्यवस्था, शहरातील रस्त्यांवर विद्युत रोषणाई तसेच 65 एकर वरील भाविकांना नदीपात्रात स्नानासाठी जाण्या येण्यासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी घाट उताराला मुरमीकरण करून भाविकांना नदीपात्रात येण्याजाण्यास योग्य केला आहे.
यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांनी शौचालयाचा वापर करावा,सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ प्रणिती भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी केले आहे.











Add Comment