पंढरपूरात शासनाच्या सेवा आपल्या दारी विशेष शिबिर; १५ हून अधिक शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आज छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर २०२६; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
पंढरपूरातील यश पॅलेस येथे २ ऑगस्ट २०२६ रोजी शासनाच्या सेवा आपल्या दारी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महसूल,रेशन कार्ड,आधार,संजय गांधी, श्रावणबाळ,महिला व बालकल्याण,आरोग्य आणि इतर १५ हून अधिक शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे .
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघात शासनाच्या सेवा आपल्या दारी या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार,दि.२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत यश पॅलेस, कराड रोड पंढरपूर येथे होणार असून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या शिबिरात महसूल विभागाच्या विविध सेवांसह फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल ७/१२ व ८अ उतारे, वर्ग-२ जमिनीची प्रकरणे, मागणी वसुली, लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न,जात,नॉन-क्रीमीलेयर, रहिवासी प्रमाणपत्रे आदी सेवा दिल्या जाणार आहेत.

तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, रेशनकार्ड विषयक सेवा,महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, मतदार यादी पडताळणी व नावनोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती व नोंदणी, आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन यांचाही लाभ नागरिकांना मिळणार आहे.
या विशेष शिबिराचे आयोजन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून पंढरपूर व परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











Add Comment