Maharashtra Politics सोलापूर जिल्हा

लोकप्रतिनिधी जनतेत अन् प्रशासन गावात; आमदार अभिजीत पाटलांच्या अभियानाचे कौतुक

आमदार अभिजीत पाटील आलेगाव येथे मुक्कामी राहून नागरिकांच्या अडचणी सोडविल्या

आलेगाव खुर्द येथे आमदार मुक्कामी आपल्या गावी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माढा विधानसभा मतदारसंघातील आलेगाव खुर्द येथे आमदार अभिजीत पाटील यांच्या आमदार मुक्कामी, आपल्या गावी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रशासन गावात आणून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा उपक्रम.

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन गावात; आमदार अभिजीत पाटलांचा अभिनव उपक्रम

माढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मत मागण्यासाठी जनतेच्या दारी जाणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या समस्या सोडविण्या साठी थेट गावात मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या आमदार मुक्कामी,आपल्या गावी या नावीन्यपूर्ण अभियानाचा प्रारंभ माढा मतदारसंघातील आलेगाव खुर्द या गावातून करण्यात आला. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या.

मत मागायला केवळ लोकांच्या दारी जायचे आणि प्रश्न असतील तर लोकांनी आपल्या दारी यायचे, ही कल्पनाच मला पटत नाही. मत मागायला जसे गावोगावी जातो, तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या गावात जाऊन जनतेमध्ये राहून त्या सोडविल्या पाहिजेत,अशी भूमिका आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी मांडली.

गावातील नागरिकांना आपल्या समस्या घेऊन वारंवार तहसील, पंचायत समिती, कृषी कार्यालय, महावितरण किंवा अन्य शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना थेट गावात आणण्याचा निर्णय या अभियानांतर्गत घेण्यात आला आहे.त्यामुळे अधिकारी गावात आणि प्रश्न आमदारांसमोर अशी या अभियानाची कार्यपद्धती राहणार आहे.

आलेगाव खुर्द येथे झालेल्या कार्यक्रमासाठी तहसीलदार संजय भोसले,पोलीस प्रशासनातील बाळासाहेब भरणे, गटविकास अधिकारी महेश सुळ,ग्रामसेवक, तलाठी,कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तसेच गावपातळीवरील समस्या मांडल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच प्रश्न मांडले जात असल्याने त्यावर तत्काळ मार्ग काढण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

शेतीपासून घरकुलापर्यंत विविध प्रश्नांवर चर्चा

शेतकऱ्यांचे शेतीविषयक प्रश्न, वीजपुरवठ्याच्या अडचणी, शेतजमिनीच्या बांधांचे प्रश्न,रस्ते,रेशन धान्य,पाणीपुरवठा, गावातील मूलभूत सुविधा, शाळा, घरकुल, आरोग्य सेवा, विविध शासकीय दाखले यांसह नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

अनेक नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाणे शक्य होत नाही. एकाच समस्येसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधावा लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. ही अडचण लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी आणून नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्याचा प्रयोग या अभियानातून करण्यात आला आहे.

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच अभियानाची ऊर्जा
गावकऱ्यांशी झालेला थेट संवाद, त्यांच्या अडचणी समजून घेण्याची मिळालेली संधी आणि प्रश्न मार्गी लागल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, हीच या अभियानाची ऊर्जा असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.जनतेच्या दारी जाणे, जनतेचा आवाज ऐकणे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे.आमदार मुक्कामी, आपल्या गावी हे अभियान त्याच कर्तव्याचा एक भाग आहे. आलेगाव खुर्द येथे मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व नागरिकांचे मनापासून आभार,असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

या अभियानाच्या माध्यमातून पुढील काळात माढा मतदार संघातील विविध गावांमध्ये मुक्काम करून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार असून गावागावातील स्थानिक प्रश्न प्रशासनाच्या मदतीने सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे या उपक्रमाकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मत मागायला जसे गावोगावी जातो तसेच समस्या सोडविण्यासाठीही जनतेच्या गावात गेलं पाहिजे. नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन कार्यालयांच्या फेऱ्या मारण्यापेक्षा प्रशासनानेच जनते पर्यंत पोहोचले पाहिजे. आमदार मुक्कामी, आपल्या गावी अभियानातून जनतेचा थेट संवाद, प्रशासनाचा समन्वय आणि समस्यांचे तत्काळ निराकरण यावर माझा भर राहणार आहे – आ. अभिजीत आबा पाटील माढा विधानसभा मतदारसंघ

 

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.