Maharashtra Politics

माढ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आ. अभिजीत पाटील आक्रमक; ८ तास वीज,पीक नुकसानभरपाईसह चारा छावण्यांची मागणी

८ तास वीज, पीक नुकसानभरपाई, चारा छावण्यांसह विविध मागण्यांचे प्रशासनाला दिले निवेदन, सोलापूर येथे पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले मॅडम व सोलापूर जिल्हाधिकारी यांची आ.अभिजीत पाटील यांनी घेतली भेट

पावसाअभावी शेतकरी संकटात; आ.अभिजीत पाटील यांनी विभागीय आयुक्तांसमोर मांडल्या ८ प्रमुख मागण्या

माढा | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८ सप्टेंबर २०२६ : माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी,पशु पालक,विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी आज सोलापूर येथे पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले व सोलापूर जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन यांची भेट घेतली. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन उपस्थित होते.मतदार संघातील विविध ज्वलंत प्रश्नांचे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ.अभिजीत पाटील यांनी यावेळी केली.

सध्या माढा आणि पंढरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सिंगल फेज लोडशेडिंगमुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.शेतीची कामे,पाणीपुरवठा तसेच दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असल्याने लोडशेडिंग कमी करून शेतकऱ्यांना किमान आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी आ.अभिजित पाटील यांनी केली.

माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना शासना कडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी,अशी मागणी आ.अभिजित पाटील यांनी केली.

तसेच जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कमी होत असल्याने गरजू गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात,पिण्याचे पाणी,जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांवर शिक्षणाचा वाढता खर्च मोठा आर्थिक भार ठरत आहे. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची फी कमी करण्याबाबत योग्य निर्णय घेऊन पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आ.पाटील यांनी प्रशासनासमोर मांडली.शेतकऱ्यां कडे वीज कनेक्शन अस्तित्वात असतानाही त्यांच्या गरजेनुसार सोलर कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. वीजपुरवठ्याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून सौरऊर्जेच्या सुविधेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे आ. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

रोजगार हमीची कामे सुरू करा

पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करून शेतकरी व मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा,अशी मागणीही आ. अभिजित पाटील यांनी केली. प्रशासनाने मतदारसंघातील वीज, पाणी,चारा,पीक नुकसान,रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी आ. अभिजीत पाटील यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. पावसा अभावी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे वीजपुरवठ्याच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. प्रशासनाने कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून तातडीने पंचनामे, नुकसान भरपाई,चारा छावण्या आणि पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना कराव्यात. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत त्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे – आ.अभिजीत पाटील माढा विधानसभा मतदारसंघ

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.