आषाढी यात्रा 2026: पंढरपूरसाठी इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड ऑफिस स्थापन; उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख कमांड ऑफिसर
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी प्रशासनाची मोठी तयारी! सर्व विभाग प्रमुखांना कंट्रोल अँड कमांड ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश
सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या पंढरपूर आषाढी यात्रा २०२६ शांततेत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी ‘इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड ऑफिस’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
२५ जुलै रोजी आषाढी एकादशी
यावर्षी आषाढी यात्रा शनिवार दि. २५ जुलै २०२६ रोजी होणार असून यात्रेचा कालावधी दि.१५ जुलै ते २९ जुलै २०२६ असा आहे. सालाबाद प्रमाणे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे लाखो भाविकांची गर्दी होणार आहे.
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांची नियुक्ती
जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३०(२)(२०) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ३ संतोषकुमार देशमुख यांची इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड ऑफिसर म्हणून यात्रा कालावधीसाठी नियुक्ती केली आहे.
सर्व विभाग प्रमुखांना हजर राहण्याचे आदेश
आदेशानुसार पंढरपूर आषाढी यात्रा २०२६ साठी स्थापन करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड ऑफिस मध्ये जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख यांनी आजपासून ते दि.२९ जुलै २०२६ पर्यंत आपल्या विभागाच्या आवश्यक त्या सर्व माहितीसह पूर्ण वेळ उपस्थित राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
वरील आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५५ व ५६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी नोंद जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आदेशात घेतली आहे.
पंढरपूर आषाढी यात्रा 2026 शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड ऑफिस स्थापन केले आहे. उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांची कमांड ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सर्व विभाग प्रमुखांना 29 जुलैपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.











Add Comment