खुडूसमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण;ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात भक्तिमय वातावरण
अश्वांच्या चौखूर दौडीने खुडूसचे रिंगण उजळले;संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ जुलै २०२६ : पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण आज खुडूस परिसरात भक्तीमय वातावरणात पार पडले. सकाळी ज्ञानोबा माऊली च्या जयघोषात रिंगण सोहळा संपन्न झाला.
पालखीचे रिंगण तळावर आगमन
माऊलींची पालखी रिंगण तळावर दाखल झाल्यानंतर सेवेकऱ्यांच्या खांद्यावरून सन्मानपूर्वक रिंगण स्थळी आणण्यात आली. त्यानंतर अश्वांना माऊलींच्या पादुकांवरील हार घालून बुक्का लावण्यात आला.
अश्वांची दौड आणि भक्तीचा झंकार
स्वाराचा अश्व व माऊलींचा अश्व रिंगणात चौखूर उधळत दौडले. त्या क्षणी जणू भक्तीचा झंकार आणि परब्रह्माची चाहुल रिंगणात उतरली होती, असा अनुभव वारकऱ्यांनी घेतला.
मानाच्या दिंड्या व भक्तांचा उत्साह
यानंतर मानाच्या दिंड्या रिंगणामध्ये दाखल झाल्या.उड्या,टाळ- मृदंगा च्या गजरात आणि ज्ञानोबा- तुकाराम च्या गजरात पावलांचा खेळ रंगला. टाळ- मृदंगाची जुगलबंदी आणि एकाच लयीत पडणाऱ्या पावलांचा ठेका पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
महिला वारकऱ्यांचा सहभाग
महिलांनी वीणेकरी म्हणून तुळशी वृंदावन घेऊन रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. पखवाज वादक व टाळकऱ्यांनी टाळांच्या गजरात भक्तीचा उत्सव अधिक खुलवला. माऊली-माऊली च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.











Add Comment