संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे
पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली; संभाव्य पूरस्थितीसाठी नगरपालिका प्रशासन सज्ज
उजनी-वीर धरणातून वाढता विसर्ग; पंढरपूरमध्ये नागरिकांसाठी स्थलांतर, निवारा व मोफत भोजनाची व्यवस्था

पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली असून उजनी व वीर धरणातून 1.05 लाखांहून अधिक क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असून नागरिकांसाठी निवारा, स्थलांतर आणि मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२ ऑगस्ट २०२६ –उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे .धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी व वीर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदी पात्रातून सायंकाळी 5.00 वाजता एक लाख 5 हजार 979 क्यूसेक्सने पाण्याचा प्रवाह सुरू असून चंद्रभागा नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी. तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत रायगड भवन पंढरपूर येथे नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य पूर परिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याचेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांनी पूर परिस्थितीवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही नगराध्यक्षा सौ प्रणिती भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी केले आहे.












Add Comment