Education Maharashtra

युवा पिढी विकसित भारताचा पाया; एआय आत्मसात करण्याचे ॲड राहुल नार्वेकरांचे आवाहन

महाराष्ट्र होणार आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर;- ॲड.राहुल नार्वेकर

युवा पिढी विकसित भारताचा पाया; ज्ञान,तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात डेटा सेंटर उभारण्याची माहिती देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर बनेल, असा विश्वास व्यक्त केला

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२१ : आजचा युवक तंत्रज्ञानाच्या बळावर पुढे जात असून युवा पिढी ही विकसित भारताचा पाया आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन त्याचा योग्य वापर केल्यास महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डेटा सेंटर उभारण्यात येणार असून, येत्या काळात महाराष्ट्र आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर बनेल. जगातील अनेक देशांचा डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम महाराष्ट्र करेल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरी महाविद्यालयात ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती या विषयावर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, विधानसभा सल्लागार ॲड.संदीप केकाणे,स्वेरी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एआय आत्मसात करणे काळाची गरज

ॲड राहुल नार्वेकर म्हणाले की, पंढरपूर ही श्रद्धा,ज्ञान आणि शेतीची भूमी आहे.याच पंढरपुरात आता तंत्रज्ञानाची नवी पिढी घडत आहे.तंत्रज्ञानाच्या बळावरच भारताने चंद्रावर झेप घेतली आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राज्य असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात आली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे जीवन अधिक सोपे झाले असले, तरी भविष्यात टिकून राहण्यासाठी एआय आत्मसात करणे आवश्यक आहे.आज एआयचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत असून नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत आहे. भारताच्या वाढत्या अपेक्षा तंत्रज्ञाना शिवाय पूर्ण करणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणताही देश यशस्वी करायचा असेल तर सरकारसोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे.लोकशाही व्यवस्थेत संविधानिक पद्धतीने विचार व्यक्त करणे गरजेचे आहे.विरोध करा मात्र तो संविधानाने दिलेल्या तरतुदीं नुसार असावा, असे आवाहन ॲड राहुल नार्वेकर यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत माहिती जाणून घेतली.

युवा शक्ती देशाचा आधारस्तंभ : आमदार समाधान आवताडे

आमदार समाधान आवताडे म्हणाले की,ज्ञान,तंत्रज्ञान आणि युवाशक्ती चा योग्य ताळमेळ साधला तर महाराष्ट्र जगाच्या इतिहासात प्रथम क्रमांकाचे राज्य बनू शकतो. तंत्रज्ञानाच्या जोरावर राज्याची प्रगती झाली आहे.युवा शक्ती हा देशाचा आधारस्तंभ असून विद्यार्थी हे देश आणि राज्याच्या विकासाचा पाया आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे.

नालंदा विद्यापीठ आजही अस्तित्वात असते तर भारत जगात प्रथम क्रमांकावर राहिला असता, असे मत व्यक्त करत त्यांनी ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र जगात अग्रेसर बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

संशोधन उपक्रमांची माहिती

यावेळी स्वेरी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांनी महाविद्यालयाची पार्श्वभूमी सांगितली.महाविद्यालयाने केलेल्या यशस्वी वाटचालीसोबतच संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात डेटा सेंटर उभारण्याची माहिती देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.