Maharashtra

पंढरपुरात अनंत विचार चा ५ वा वर्धापन दिन उत्साहात;५१ वर्षांच्या पत्रकारितेसाठी बाळासाहेब बडवेंचा जीवनगौरव

साप्ताहिक ‘अनंत विचार’चा ५ वा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

पंढरपुरात साप्ताहिक अनंत विचार चा ५ वा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.ज्येष्ठ संपादक बाळासाहेब बडवे यांना ५१ वर्षांच्या पत्रकारितेसाठी जीवनगौरव पुरस्कार

अनंत विचारच्या वर्धापन दिन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान; चिमुकल्या दुर्वाच्या भाषणाने जिंकली मने

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : लोकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पत्रकारितेची अविरत वाटचाल करणाऱ्या ‘साप्ताहिक अनंत विचार’चा पाचवा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी पंढरपूर येथील मोरारजी कानजी माणिकबा सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर जळगावकर महाराज होते. प्रमुख उपस्थितांमध्ये पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके, ज्येष्ठ संपादक बाळासाहेब बडवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, युवक नेते प्रणव परिचारक, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, ज्येष्ठ पत्रकार डॉ राजेश फडे, भारुड साम्राज्ञी चंदाताई तिवाडी, नगरसेवक ओंकार जोशी, ह.भ.प.हरिदास महाराज, नगरसेवक प्रसाद (भैय्या) कळसे,अक्षय देशपांडे, शिवश्री दत्तात्रय काळे महाराज, महादेव आदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ‘साप्ताहिक अनंत विचार’च्या २०२६ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पाच वर्षांची निर्भीड पत्रकारितेची वाटचाल

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संपादक नागेश आदापुरे यांनी ‘अनंत विचार’च्या पाच वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. लोकांच्या समस्या, प्रशासनाच्या योजना, जनआंदोलने, राजकीय घडामोडी तसेच जनतेच्या न्याय व हक्कांसाठी निर्भीडपणे आवाज उठविण्याचे काम साप्ताहिकाने सातत्याने केल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अनंत विचार’ची स्थापना करण्यात आली. गेली पाच वर्षे एकही अंक न चुकवता हे साप्ताहिक सुरू आहे. या वाटचालीत वाचक, दर्शक, ज्येष्ठ पत्रकार बांधव, हितचिंतक, मान्यवर आणि कुटुंबीयांची मोलाची साथ मिळाली,असे नागेश आदापुरे यांनी नमूद केले.

मागील पाच वर्षांत ‘अनंत विचार’च्या विशेषांकांचे प्रकाशन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय २०२५ पुरस्कार केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

५१ वर्षांच्या पत्रकारितेचा जीवनगौरव

ज्येष्ठ संपादक बाळासाहेब बडवे यांच्या ५१ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारिता सेवेला विशेष सलाम करत त्यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

– प्रा. डॉ. भारत कृष्णा गायकवाड — आदर्श शिक्षण सेवा पुरस्कार
– संजय धोंडीबा देशमुख — उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार
– ॲड. राजन दीक्षित — समाजसेवा पुरस्कार
– संध्याताई साखी — सांस्कृतिक सेवा पुरस्कार
– नितीन सरडे — युवा नेतृत्व पुरस्कार
– बाळासाहेब बडवे — पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार
– राहुल अशोक कांबळे — कर्तव्यनिष्ठ पोलीस सेवा पुरस्कार
– माधुरी सुभाष गाजरे — उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
– प्रा. अंबादास रामा नेटके — आध्यात्मिक सन्मान पुरस्कार
– सुवर्णता व दादासाहेब खरात — आदर्श शिक्षक पती-पत्नी पुरस्कार
– ‘पंढरीची वाट, भावनेची गाठ’ — उत्कृष्ट समाजप्रबोधनात्मक लघुपट पुरस्कार
– सुजित कुमार कांबळे — उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार
– विशाल मोहन देवळे — सुरक्षा सेवा पुरस्कार
– आरती व ओंकार बसवंती — आदर्श समाजसेवी दाम्पत्य पुरस्कार

पुरस्काराला उत्तर देताना बाळासाहेब बडवे यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारिता प्रवासातील संघर्षाच्या आठवणी सांगितल्या. पत्रकारितेप्रती आपली निष्ठा व्यक्त करताना त्यांनी स्वतःची मालमत्ता विकूनही पत्रकारिता केल्याचे सांगितले. तसेच संपादक नागेश आदापुरे हे आपल्या प्रपंचातून दहा टक्के रक्कम साप्ताहिकाच्या कामासाठी खर्च करून पत्रकारितेची धुरा सांभाळत असल्याचे कौतुक केले आणि त्यांना मोलाचे मार्गदर्शन व शुभाशीर्वाद दिले.

ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांनीही मनोगत व्यक्त करून ‘साप्ताहिक अनंत विचार’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनीही साप्ताहिकाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चिमुकल्या दुर्वाच्या भाषणाने जिंकली उपस्थितांची मने

इयत्ता पाचवीत शिकणारी चिमुकली दुर्वा गणेश भुमकर हिने आपल्या प्रभावी भाषणातून ‘साप्ताहिक अनंत विचार’ला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तिच्या ओघवत्या वक्तृत्वाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ऋषीकेश आदापूरे, यश आदापूरे,श्रीनाथ चौक तरुण मंडळ, डी.ए.ग्रुप तसेच सर्व मित्रपरिवाराने केलेल्या सहकार्याबद्दल संपादक नागेश आदापुरे यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता दूधभाते यांनी केले. आभार प्रदर्शन पंढरपूर नगरपालिका इंटक युनियनचे माजी अध्यक्ष महादेव आदापुरे यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.उपस्थितांसाठी प्रीतीभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

पत्रकारिता ही केवळ साप्ताहिक चालविण्यापुरती मर्यादित नसून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि लोकशाहीला बळ देण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा संदेश देत ‘साप्ताहिक अनंत विचार’चा पाचवा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.