india Politics

महिला सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेस व राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करावे : डॉ.नीलम गोऱ्हे

महिला सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेस व राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करावे : डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला सन्मानाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत पक्षातील महिलां विषयीच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्ये व घटनांबाबत आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.

महिला सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे; डॉ.नीलम गोऱ्हेंचा राहुल गांधींवर निशाणा

पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २४ ऑगस्ट २०२६ : महिलांच्या सन्मानाचे आणि सक्षमीकरणाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने आपल्या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांकडून महिलांबाबत झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्ये व घटनांबाबत आधी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. महिला सन्मान हा केवळ राजकीय घोषणेचा विषय नसून सामाजिक आणि घटनात्मक जबाबदारीचा विषय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

१९९३ च्या दिल्लीतील तंदूर प्रकरणाचा संदर्भ देत डॉ. गोऱ्हे यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत राजकीय पक्षांची जबाबदारी अधोरेखित केली. तसेच २०१४ मधील लातूरच्या कल्पना गिरी प्रकरणात काँग्रेसशी संबंधित राजकीय वर्तुळातील व्यक्तींवर झालेले गंभीर आरोप आणि आरोपींना झालेल्या शिक्षेचाही त्यांनी उल्लेख केला.

मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्याने महिलांचा माल असा केलेला उल्लेख, दक्षिण भारतातील काँग्रेसच्या महिला आमदाराच्या सत्कारावेळी पदाधिकाऱ्याने मिठी मारण्याचा कथित प्रयत्न, तसेच कर्नाटकातील काँग्रेस आमदाराचे बलात्काराबाबतचे कथित असंवेदनशील वक्तव्य यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या राष्ट्रपत्नी उल्लेखाचा निषेध करताना, हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर घटनात्मक पदाचा अवमान असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला काँग्रेसने केलेल्या विरोधावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या काळातील महिलां विरोधातील गुन्हे आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलांकडून चुका होतात या वक्तव्याचा संदर्भ देत महिलांवरील अत्याचारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मुस्लिम महिलांच्या अधिकारांच्या प्रश्नावरही काँग्रेसची भूमिका संशयास्पद राहिली आहे. शाहबानो प्रकरणानंतर पोटगीच्या अधिकारावर मर्यादा आणणारा कायदा करण्यास काँग्रेस सरकारने पुढाकार घेतला त्यामुळे मुस्लिम महिलांच्या न्याय्य अधिकारांवर गदा आली,अशी टीका डॉ. गोऱ्हे यांनी केली. आजही समान नागरी कायद्याला काँग्रेसकडून विरोध केला जात असून, महिलांना समान हक्क आणि न्याय देण्याच्या विरोधातच काँग्रेसने कायम भूमिका घेतली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

महिला सन्मान हा राजकारणाचा विषय नसून सामाजिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे. महिलांच्या सन्मानावर कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारता येणार नाही. काँग्रेसने आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.