Maharashtra Politics

अमरावती हत्याकांड : पीडित कुटुंबीयांशी आमदार डॉ.नीलम गोऱ्हेंचा संवाद; नशाखोरी-टवाळखोरीवर कठोर कारवाईचे निर्देश

अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे आक्रमक; गोपनीयता राखण्यासह आरोपीला जलद शिक्षा देण्याची मागणी

अमरावती हत्याकांड : पीडित कुटुंबीयांशी डॉ.नीलम गोऱ्हेंचा संवाद; नशाखोरी-टवाळखोरीवर कठोर कारवाईचे निर्देश

अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. कुटुंबाची गोपनीयता, नशाखोरी- टवाळखोरीवर कारवाई आणि आरोपीला जलद शिक्षा देण्याची मागणी

अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पीडित कुटुंबीयांशी संवाद

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५ सप्टेंबर २०२६ : अमरावती येथे अल्पवयीन मुलीच्या झालेल्या हत्येच्या घटनेने समाजमन हेलावून गेले आहे. या संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमी वर सामाजिक कार्यकर्त्या प्रीती कुंबरे यांनी पीडित कुटुंबाच्या घरी भेट देऊन मुलीच्या वडिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याशी मुलीच्या वडिलांचा दूरध्वनीवरून संवाद करून दिला.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुलीच्या वडिलांची विचारपूस करून त्यांना धीर दिला.या संवादादरम्यान कुटुंबीयांनी आपल्या व्यथा तसेच परिसरातील काही गंभीर प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

पीडित कुटुंबाची गोपनीयता राखण्याची मागणी

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या गावाची तसेच कुटुंबाची गोपनीय माहिती काही व्यक्तींकडून सार्वजनिक केली जात आहे. त्याच बरोबर मुलीच्या आईचे फोटोही काही ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

पीडित कुटुंबाची ओळख, खासगी माहिती किंवा फोटो प्रसारित करून त्यांच्या दुःखात भर घालणारे प्रकार तातडीने थांबवावेत, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या मागणीची दखल घेत संवेदनशील प्रकरणात पीडित कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

नशाखोरी आणि टवाळखोरीवर कठोर कारवाईची मागणी

परिसरातील नशाखोरी, टवाळखोरी तसेच मुलींचा पाठलाग आणि टिंगलटवाळी करणाऱ्या तरुणांच्या वाढत्या प्रकारांबाबतही कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली.

चौकाचौकात बसणाऱ्या अशा प्रवृत्तींवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि महिला व मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी करण्यात आली.

डॉ. गोऱ्हे यांनीही अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली असून संशयास्पद हालचाली किंवा छेडछाडीच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन केले.

आरोपीविरुद्ध जलदगतीने कारवाई करून कठोर शिक्षा द्या

या प्रकरणातील आरोपीविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात यावे आणि खटला प्रभावीपणे चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी,अशी पीडित कुटुंबाची अपेक्षा आहे.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबीयांना धीर देत प्रकरणातील पुढील कायदेशीर कार्यवाही जलदगतीने व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.

तसेच या प्रकरणासाठी अनुभवी आणि सक्षम सरकारी वकील उपलब्ध करून देण्याबाबतही आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवणार

पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या भावना आणि मागण्यांची दखल घेत डॉ. नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन पाठवणार आहेत.

या निवेदनात पीडित कुटुंबाची गोपनीयता राखणे, कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी किंवा चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ न देणे,परिसरातील नशाखोरी आणि टिंगलटवाळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे तसेच आरोपीविरुद्ध जलदगतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे या मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

पीडित कुटुंबाच्या गोपनीयतेची जाणीव सर्वांनी ठेवावी

पीडित कुटुंबाच्या दुःखाची आणि त्यांच्या गोपनीयतेची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये अपुरी किंवा चुकीची माहिती प्रसारित करून कुटुंबाची बदनामी होणे अत्यंत चुकीचे आहे. परिसरातील नशाखोरी, टवाळखोरी आणि मुलींचा पाठलाग करणाऱ्या प्रवृत्तींवरही पोलिसांनी कठोरपणे प्रतिबंधात्मक कारवाई करावी,असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी चर्चा

दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी चर्चा केली.या चर्चेदरम्यान प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल करण्यासोबतच टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी परिसरातील परिस्थितीवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

नागरिकांना पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन

परिसरातील नागरिकांनी महिला व मुलींच्या सुरक्षितते संदर्भात कोणतीही संशयास्पद घटना, छेडछाड, पाठलाग, टिंगलटवाळी किंवा नशाखोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास वेळीच पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. तक्रार करण्यास विलंब करू नये, असे आवाहन आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याबरोबरच परिसरातील महिलांना आणि मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.