जन्मभूमीच्या विकासाचा ध्यास! ड्रोनच्या नजरेतून उलगडणारं नवं सरकोली; पर्यटनासह आधुनिक गावठाणाचा महत्त्वाकांक्षी आराखडा
गावाच्या उंचीसाठी आधुनिक विकासाचा वसा; सरकोलीत कृषी-तीर्थ पर्यटनासह डिजिटल शाळा, ड्रेनेज,घाट अन् बोट धक्का
सरकोली गावठाण आणि कृषी- तीर्थ पर्यटन क्षेत्राच्या आधुनिक विकासासाठी ड्रोन शूटिंग; रस्ते,ड्रेनेज, डिजिटल शाळा,घाट,बोट धक्का,बगीचा आणि पर्यटक निवासाचा विकास आराखडा तयार होणार.
जन्मभूमीच्या विकासाचा ध्यास! ड्रोनच्या नजरेतून उलगडणारं नवं सरकोली, पर्यटनासह आधुनिक गावठाणाचा महत्त्वाकांक्षी आराखडा
सरकोली ता.पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ५ सप्टेंबर २०२६ : विकासाची दिशा, जन्मभूमीवरील प्रेम आणि गावाच्या विकासासाठी घेतलेला वसा यासोबत सामाजिकतेचे भान असेल तर गावाची उंची निश्चितच वाढते, या भावनेतून सरकोलीच्या सर्वांगीण विकासाची नवी संकल्पना आकार घेत आहे.
सरकोली येथे कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्याबरोबरच नवीन सरकोली गावठाण आधुनिक सुविधांनी विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. त्यासाठी शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथील नामवंत कंपनीच्या माध्यमातून मोठ्या ड्रोनद्वारे परिसराचे शूटिंग करण्यात आले.
या ड्रोन शूटिंगच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या छायाचित्रे आणि दृश्यांच्या आधारे सरकोलीच्या भविष्यातील विकासाचा आधुनिक आराखडा तयार करण्यात येत आहे.
नवीन सरकोली गावठाणात आधुनिक सुविधांचा संकल्प
नवीन गावठाणाच्या नियोजनामध्ये केवळ रस्ते बांधण्यापुरता विकास मर्यादित न ठेवता नागरिकांच्या दैनंदिन गरजा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि पर्यटन या सर्व बाबींचा विचार करण्यात येत आहे.
प्रस्तावित विकास आराखड्यात पुढील सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे —
आधुनिक रस्ते व्यवस्था,भूमिगत ड्रेनेज व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन,सांडपाणी व्यवस्थेसाठी स्वतंत्र पाइपलाइन,मुलांसाठी खेळाचे मैदान,डिजिटल शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृह व मुतारी, दवाखाना, ग्राम सचिवालय, आरसीसी वॉल कंपाउंड,बगीचा आणि हरित क्षेत्र नागरिकांसाठी आवश्यक इतर सार्वजनिक सुविधा यामुळे नवीन सरकोली गावठाणाची रचना अधिक नियोजनबद्ध आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न आहे.
माण नदीकाठी पर्यटनाला नवी दिशा
सरकोलीच्या विकास आराखड्यात माण नदी आणि खंडोबा मंदिर परिसरालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.खंडोबा मंदिराजवळील माण नदीवर नवीन पूल उभारण्याची संकल्पना असून नदीकाठी घाट,बोटींसाठी धक्का आणि पर्यटकांसाठी निवास व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.
कृषी,धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा एकत्रित विचार करून सरकोलीला कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटनाचे आकर्षक केंद्र बनविण्याची संकल्पना पुढे आली आहे.
ड्रोन शूटिंगमुळे विकास आराखड्याला आधुनिक आधार
संपूर्ण परिसराचे मोठ्या ड्रोनद्वारे हवाई शूटिंग करण्यात आल्यामुळे गावठाण,नदी परिसर,मंदिर परिसर, रस्ते व प्रस्तावित पर्यटन क्षेत्राचा व्यापक आढावा घेणे शक्य होणार आहे.
या दृश्यांच्या आधारे उपलब्ध जमीन,प्रस्तावित सुविधा, वाहतूक व्यवस्था,पर्यटनस्थळे आणि सार्वजनिक सुविधांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आधुनिक विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
शासनाच्या योजनांचा घेणार आधार
सरकोलीचा विकास केवळ एका स्तरावर न करता वैयक्तिक सहभागा सोबत राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवीन गावठाण आणि कृषी- तीर्थ पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
यातून गावातील मूलभूत सुविधा मजबूत होण्याबरोबरच पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
गावासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज
या विकास संकल्पनेमागे जन्मभूमीशी असलेले नाते, सामाजिक बांधिलकी आणि गावाच्या भविष्यासाठी काहीतरी करण्याची भावना असल्याचे या उपक्रमातून दिसून येते.
सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सचिव सुधीर साहेबराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डाळिंब रत्न दत्तात्रय साहेबराव भोसले यांच्या सहकार्याने हा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी मा.पोलीस अंमलदार विलास श्रीरंग भोसले यांनी ही सेवाभावी भावनेतून माहिती दिली आहे.
सरकोलीच्या विकासाचा मॉडेल ठरणार ?
रस्ते,पाणी,ड्रेनेज,डिजिटल शिक्षण, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांसोबतच नदीकाठचा विकास, घाट,बोट धक्का,बगीचा आणि पर्यटक निवास अशा सुविधा एकाच विकास आराखड्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याने सरकोलीच्या विकासाला ग्रामीण भागातील नियोजनबद्ध विकासाचे नवे उदाहरण निर्माण करण्याची संधी मिळू शकते.
जन्मभूमीशी नाळ जोडून आधुनिक विकासाची वाटचाल करण्याचा हा प्रयत्न प्रत्यक्षात किती यशस्वी होतो, याकडे आता सरकोलीकरांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.











Add Comment