मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची पंढरपुरात पाहणी; चंद्रभागा घाट, विठ्ठल मंदिर परिसरासह प्रस्तावित कॉरिडॉरचा घेतला आढावा
कॉरिडॉरला गती देण्याच्या सूचना;मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक घेतले विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पंढरपुरातील चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली.प्रस्तावित कॉरिडॉर,भाविक सुविधा व विकासकामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पंढरपूर,दि.९ | जिमाका: महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूर दौऱ्या दरम्यान चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली.यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले.
चंद्रभागा घाट परिसराची पाहणी
मुख्य सचिव श्री.अग्रवाल यांनी प्रथम चंद्रभागा घाट परिसराची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नदीपात्र स्वच्छता,भाविकांसाठी स्नान सुविधा,प्रकाश व्यवस्था तसेच घाटावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आषाढी-कार्तिकी वारीतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उपाययोजनाबाबत सूचना दिल्या. तसेच यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन भाविक, वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व प्रस्तावित कॉरिडॉर
त्यानंतर श्री.अग्रवाल यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली.यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत 73 कोटीच्या निधीतून झालेल्या मंदिर विकास,सुशोभिकरण कामांची पाहणीही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी प्रस्तावित श्री क्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत माहिती दिली.यामध्ये मंदिर परिसरातील भाविकांसाठी सुलभ दर्शन मार्ग, प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग व अत्याधुनिक सुविधा तसेच भक्त निवास, बहुमजली पार्किंग, प्रसादालय,माहिती केंद्र,वैद्यकीय मदत कक्ष,वृद्ध व दिव्यांगांसाठी विशेष मार्ग,सुरक्षा व नियोजन: गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश- निर्गम मार्ग, सीसीटीव्ही व अग्निशमन यंत्रणा आदी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग व पंढरपूर शहर व परिसरात गर्दी नियंत्रणासाठी व वाहतूक नियमासाठी पोलीस प्रशासनाकडून वापरण्यात आलेल्या एआय तंत्रज्ञाना बाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
प्रस्तावित विकासकामे,भाविकांच्या सुविधा आणि परिसराच्या एकात्मिक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.मुख्य सचिवांनी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व समन्वयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्यातील शेतकरी व भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.यावेळी मंदिर समिती च्यावतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांचा सत्कार केला.

यावेळी नगराध्यक्षा सौ डॉ प्रणिता भालके, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी,प्रांत अधिकारी सचिन इथापे, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुंटे,पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.












Add Comment