नाशिक–पुणे सरळ रेल्वेसाठी नोकरदारांचा बुलंद आवाज; ९ ऑगस्टच्या जनआंदोलनात मोठ्या सहभागाचे आवाहन
दररोजचा प्रवास,वाढता खर्च अन् वाहतूक कोंडी! नाशिक–पुणे सरळ रेल्वेसाठी ९ ऑगस्टला जनआंदोलन
नाशिक–पुणे सरळ रेल्वेच्या मागणीसाठी नोकरदार, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी एकवटले असून ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ ऑगस्ट २०२६ : नाशिक–पुणे सरळ रेल्वे ही केवळ वाहतूक सुविधा नसून लाखो नोकरदारांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित गरज बनली आहे. दररोज नाशिक–पुणे आणि पुणे–नाशिक असा प्रवास करणाऱ्या नोकरदारांनी आता सरळ रेल्वेच्या मागणीसाठी एकजूट दाखवत ९ ऑगस्टच्या जनआंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

खासगी कंपन्या,आयटी क्षेत्र, औद्योगिक आस्थापना तसेच विविध सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचारी रोजच्या वाहतूक कोंडीमुळे तासन्तास रस्त्यावर अडकून राहतात.वाढता टोल,इंधनाचा खर्च, मानसिक ताण आणि कुटुंबासाठी कमी मिळणारा वेळ यामुळे सरळ रेल्वेची गरज अधिक तीव्र झाली असल्याची भावना नोकरदार व्यक्त करत आहेत.

सरळ रेल्वे मार्गामुळे प्रवास अधिक जलद,सुरक्षित आणि किफायतशीर होईल. त्याचबरोबर पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील रोजगाराच्या संधी अधिक सुलभ होतील, उद्योगांना चालना मिळेल आणि प्रादेशिक विकासालाही मोठी गती मिळेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
या आंदोलनाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून हा सामान्य नागरिकांच्या विकासाचा आणि भविष्यासाठीचा लढा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी या सर्व घटकांच्या हिताचा हा प्रश्न असल्याने ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणाऱ्या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरळ रेल्वेच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












Add Comment