पंढरपूरातील स्विमिंग टँक ठरतोय मौत का कुआं’; चार तरुणांच्या मृत्यूमुळे काँग्रेस ओबीसीचे लाक्षणिक उपोषण
पंढरपूरमधील पद्मावती उद्यानाजवळील स्विमिंग टँकमध्ये आतापर्यंत चार तरुणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ओबीसीच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दोषींवर कारवाई व ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिले लेखी आश्वासन
चार तरुणांचा बळी, तरीही स्विमिंग टँक सुरूच? पंढरपुरात काँग्रेस ओबीसीचे आंदोलन
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर शहरातील पद्मावती उद्यानाजवळील स्विमिंग टँकमध्ये आतापर्यंत चार तरुणांचा बळी गेल्याचा आरोप करत या प्रकरणातील कथित गलथान कारभाराविरोधात सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसीच्या वतीने मंगळवार दि.1 सप्टेंबर 2026 रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जिल्हा ओबीसी काँग्रेसचे माजी अध्यक्ष समीर कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
स्विमिंग टँकमध्ये 2024 मध्ये पहिला तरुण बळी गेल्यानंतर या घटनेची नेमकी काय चौकशी करण्यात आली, कोणावर कारवाई झाली आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली का,असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.पहिली दुर्घटना घडूनही संबंधित स्विमिंग टँक पुन्हा सुरू करण्यात आला तसेच त्याच ठेकेदाराला पुन्हा काम देण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
मुख्याधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट
आंदोलनाची दखल घेत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. संबंधित प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.एफआयआर क्रमांक 0550 असून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
तसेच संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याबाबतही लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही तर गणेश विसर्जनानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा काँग्रेस ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
स्विमिंग टँकसारख्या सार्वजनिक सुविधांमध्ये नागरिकांच्या सुरक्षे साठी आवश्यक उपाययोजना, प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षा साधने आणि आपत्कालीन व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनात पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर,उपाध्यक्ष सुहास भाळवणकर,जिल्हा सचिव प्रा. अशोक डोळ, ओबीसी अध्यक्ष मिलिंद अढवळकर,युवक अध्यक्ष संदीप शिंदे,शिवाजीराजे धोत्रे,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष देवानंद इरकल,सोशल मीडिया शहराध्यक्ष महेश अधटराव,माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आसबे, सायबू वाघमारे यांच्यासह काँग्रेस ओबीसीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Add Comment