पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराने समाजमन हादरले; दोषीला कठोर शिक्षा द्या : आमदार सत्यजीत तांबे
जुन्नर अत्याचार प्रकरणी आमदार सत्यजीत तांबे आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे १० वर्षीय चिमुकली वरील अत्याचार व हत्या प्रकरणाचा आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र निषेध केला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत जलद तपासाची अपेक्षा व्यक्त केली.
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ ऑगस्ट २०२६ : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने समाजमन हादरले आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत दोषी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
आपल्या समाजात इतक्या राक्षसी प्रवृत्तीचे नराधम वावरत आहेत आणि आपल्या मुलींवर सातत्याने अत्याचारांची टांगती तलवार आहे, ही बाब केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणूनही धक्का देणारी आहे, अशी भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.

पिंपळवंडीतील या चिमुकलीने किती यातना भोगल्या असतील आणि तिचे आई-वडील सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असतील, याची कल्पनाही करवत नाही. एका निष्पाप मुलीचा अशा पद्धतीने अंत होणे ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक बाब आहे, असे तांबे म्हणाले.

अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषी नराधमास कठोर शिक्षा मिळावी, अशी शासनाकडे माझी आग्रहाची मागणी आहे, असे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.












Add Comment