Maharashtra पर्यटन

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला..! रत्नागिरीतील सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव..

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला..! रत्नागिरीतील सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव..

हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजूनी सळसळती
नीळ नीळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती

कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेच्या या ओळी वाचताना डोळ्यांसमोर जो निसर्गाचा विलोभनीय कॅनव्हास उभा राहतो, तोच कॅनव्हास सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमधील सड्यांवर प्रत्यक्षात अवतरला आहे. पावसाच्या अधूनमधून बरसाणाऱ्या सरी ओसरल्यावर, इथल्या तांबड्या मातीच्या सड्यांनी जणू हिरवा शालू नेसला आहे. त्यावर विलोभनीय रानफुलांची रंगीबेरंगी ‘वेलबुट्टी’ साकारली आहे.

साताऱ्याचे ‘कास पठार’ आणि कोल्हापूरचे ‘मसाई पठार’ यांनी आजवर आपल्या रानफुलांच्या सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे.पण आता रत्नागिरी परिसरातील सडेही आम्ही देखील पाठीमागे नाही, येवा आमचो सौंदर्य न्याहाळा! अशी प्रेमळ साद पर्यटकांना घालत आहेत. साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे, नाटे अशा २० ते २२ हून अधिक सड्यांवर सध्या निसर्गाने विविध रंगांच्या रानफुलांची अक्षरशः उधळण केली आहे.

या सड्यांवर सध्या दीपकाडी, कंदीलपुष्प, कुमुदिनी, रानहळद, विविध प्रकारच्या अमरी, चोहळा, परजीवी वाढणारे आकर्षक तुरे, केना अशा कितीतरी रानफुलांनी बहर आणला आहे.

‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे या सौंदर्याविषयी सांगताना म्हणतात, साडवलीच्या सड्यावर एकदांडी (Dipcadi concanense) ही कंदवर्गीय वनस्पती सध्या फुलली आहे.या प्रजातीचा ‘देवरुखेन्स’ हा एक नवा वाणही समोर आला आहे. पावसाळ्यातील एक-दोन महिने आपले मनमोहक रूप दाखवून या वनस्पती पुन्हा जमिनीत सुप्तावस्थेत जातात.

चोहळा – ओहोळांच्या कडेला वाढणारी ‘चोहळा (Curcuma scaposa) ही आलेवर्गीय वनस्पती सध्या निसर्गाच्या कुशीत फूलली आहे. औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती आता दुर्मिळ आणि धोकाग्रस्त प्रजातींमध्ये मोडते.

गुलाबी कापरी कमळ (Cleome angulata) – जैतापूर, नाटे आणि धाऊलवल्ली अशा १० ते १२ गावांच्या परिसरातील सड्यांवर ‘कापरी कमळ’ पाहायला मिळते. डॉ. अरुण चांदोरे आणि डॉ. श्रीरंग यादव यांनी शोधून काढलेली ही वनस्पती अतिशय सुंदर आहे. तिला पाणतिळवण असेही म्हणतात. तिची नाजूक गुलाबी फुले वाऱ्यावर डोलताना पाहून त्या आकर्षक सौंदर्यात हरवायला होतं. ती डोलताना कापत असल्याचा भास होतो. एकाचवेळी ताटवे फूलल्याने संपूर्ण सडे गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहेत.

गुलाबी भुईचक्र – वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रताप नाइकवडे सांगतात, साडवली आणि आंबोलीच्या सड्यांवर (Iphigenia devrukhensis) म्हणजेच ‘गुलाबी भुईचक्र’ ही वनस्पती आढळते. दीपकाडीच्या आधी फूलणारी ही अतिशय सुंदर फुले, सड्यावर जणू एक गुलाबी चादरच अंथरतात. तिला तिची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख आता प्राप्त झाली आहे.हे सौंदर्य केवळ पाहण्यासाठी नाही, तर जपण्यासाठीही आहे. याच उद्देशाने सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे गेली अनेक वर्षे ‘फुलोत्सव’ साजरा केला जात आहे. यातून विद्यार्थ्यांना या नैसर्गिक अधिवासाची आणि फुलांची शास्त्रीय माहिती दिली जाते. या सड्यांची आणि दुर्मिळ रानफुलांची जपणूक करणे ही आता आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी बनली आहे.

निसर्गाचे हे अद्भुत आणि निखळ सौंदर्य डोळे भरून पाहताना, मनातील कोलाहल शांत होतो आणि मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहून ही लहान रे
तुझ्या संगे सडा रहावे, विसरुन शाळा, घर सारे
ओठांवर सहजच या ओळी रेंगाळू लागतात..

— प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.