Maharashtra Politics

साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. नीलम गोऱ्हेंचा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. नीलम गोऱ्हेंचा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

साताऱ्यात 34 शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत; महसूल समाधान शिबिरात डॉ. नीलम गोऱ्हेंची महत्त्वपूर्ण घोषणा

सातारा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लाडकी बहीण योजना, महिला शेतकरी विधेयक, पाणंद रस्ते, महसुली सेवा आणि 34 शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला.

सातारा | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अंतर्गत सातारा शहर येथे आयोजित विशेष समाधान शिबिराला शनिवारी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेत्या, आमदार तथा अभियानाच्या सातारा जिल्हा प्रभारी डॉ.नीलम गोऱ्हे आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरातून महसूल विभागासह विविध शासकीय योजनांचा लाभ आणि नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख,पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या या अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती,दाखले, प्रमाणपत्रे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सुविधा या शिबिरातून देण्यात आली.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या मनोगतात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून देत कोविड काळात त्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. शिबिरात महिलांची मोठी उपस्थिती दिसत असल्याचे नमूद करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून पात्र महिलांना तिचा लाभ सातत्याने मिळेल, अशी ग्वाही दिली.

नागरिकांना विविध योजनांसाठी अर्ज करताना तसेच बँक व्यवहार आणि हयातीच्या दाखल्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.महिला शेतकरी विधेयकामुळे महिलांना स्वतंत्र ओळख मिळणार असल्याचे सांगत बचत गटांच्या महिलांना माफक दरात शेती भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याच्या निर्णय सरकारने घेतले असून महिलांना त्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येणार असल्याचे सांगितले.

पाणंद रस्त्यांच्या विकासाला शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्व असल्याचे नमूद करत संबंधित योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,अशी अपेक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.जमिनीसंदर्भातील बनावट कागदपत्रांच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग प्रभावीपणे काम करत असल्याचेही सांगितले.नव्याने दारिद्र्यरेषेखालील उत्पन्नाचे दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील ३४ विविध योजनांचा समावेश या अभियानात असून, २२ हजार ५०४ लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचणार असून आगामी काळात लाभार्थ्यांची संख्या वाढवणार असल्याची माहिती दिली. प्रशासनातील प्रलंबित जनहिताची कामे शून्यावर आणण्याचा प्रयत्न या अभियानातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली. या अभियानातून शासनाच्या सेवा अधिक सुलभपणे नागरिकांपर्यंत पोहोचत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना महसुली दाखल्यांचे वितरण करण्यात आले. गोसावी, कुंभार यांसह विविध समाजघटकांतील नागरिकांना आवश्यक दाखले देऊन शासनाच्या सेवा त्यांच्या दारी पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला.

शिबिरातील विविध विभागांनी उभारलेल्या माहिती स्टॉलना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देत योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी केली. नागरिकांमध्ये शासनाच्या योजनांविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी स्टॉलवरील संबंधितांना दिल्या. महावितरणच्या स्टॉलला भेटीदरम्यान त्यांनी मंदिरे, रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना करत, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक विकासासाठी अशा योजनांचा अधिकाधिक विस्तार करण्यावर भर देण्याचे सांगितले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.