सोलापूर विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्वेरीचे वर्चस्व; चंद्रशेखर विजापुरे प्रथम, दीक्षा शिंदे तृतीय तर मयूर आसबे चतुर्थ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2025-26 गुणवत्ता यादीत स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश. चंद्रशेखर विजापुरे विद्यापीठात प्रथम,दीक्षा शिंदे तृतीय,मयूर आसबे चतुर्थ क्रमांकावर
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० जुलै २०२६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या गुणवत्ता यादीत गोपाळपूर ता. पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत चंद्रशेखर संजय विजापुरे यांनी ९.८६ सीजीपीए (८६.९१%) गुणांसह प्रथम क्रमांक, दीक्षा चंद्रकांत शिंदे यांनी ९.७७ सीजीपीए (८६.८७%) गुणांसह तृतीय क्रमांक, तर मयूर रामचंद्र आसबे यांनी ९.६० सीजीपीए (८२.७४%) गुणांसह चतुर्थ क्रमांक पटकावला.
या यशामागे स्वेरीमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन Triple PE या शिक्षण पद्धतीचा मोठा वाटा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या पद्धतीत गुणवत्तापूर्ण अध्यापन, शिस्तबद्ध अभ्यास,लेखी सराव, नियमित पुनरावृत्ती, संशोधनाभिमुख शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जातो.
महाविद्यालयात नियमित युनिट टेस्ट, सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका विश्लेषण, वैयक्तिक शंका निरसन, प्रगत अध्ययन सत्रे, पालकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची प्रभावी प्रणाली राबविली जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक भक्कम होऊन त्यांना विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय यश मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या यशामागे संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, सचिव डॉ. सूरज रोंगे,उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ.संदीप वांगीकर तसेच विभागातील प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, पदाधिकारी, विश्वस्त, सर्व विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.











Add Comment