स्वातंत्र्य दिनी उपद्रवी परदेशी तणांना चले जाव! तळजाई वनक्षेत्रात माबिची अनोखी हरित मोहीम
स्वातंत्र्य दिनी पुण्यातील तळजाई-पाचगाव वनक्षेत्रात माबि व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उपद्रवी परदेशी तणांविरोधात जनजागृती मोहीम; देशी वनस्पती संवर्धनाचा संकल्प.
स्वातंत्र्य दिनी भारतातील उपद्रवी परदेशी तणांचे उच्चाटन…माबि हरित चळवळी अंतर्गत अनोखा उपक्रम साजरा…
पुणे| ज्ञानप्रवाह न्यूज –१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.याच विशेष दिनाचे औचित्य साधून मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि); बायोस्फिअर्स; वनजा क्लब, डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन (BNCA); जैवतंत्रज्ञान विभाग,आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे; वनस्पती शास्त्र विभाग,फर्ग्युसन महाविद्यालय पुणे; उद्यान कक्ष,पुणे महानगरपालिका; इतर सेवाभावी, शैक्षणिक व संशोधन आणि शासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी तळजाई,पाचगाव- पर्वती वनक्षेत्रात उपद्रवी परदेशी तणांबाबत योग्य ती जनजागृती व पर्यावरणीय साक्षरता यावी, ह्या हेतूने प्रतीकात्मक दृष्टीने कॉसमॉस सल्फ्यूरीयस् या मैक्सिकन उपद्रवी परदेशी तणाच्या उच्चाटन मोहीमेचे आयोजन केले होते.सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी स्थानिक- देशी वनस्पतींचे रोपण देखील केले.

सदर उपक्रमाला स्थानिक-नागरिक, निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमी, हरित-कार्यकर्ते,विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी यांची उपस्तिथी लक्षणीय होती.
सदर उपक्रमाचे संयोजन आणि महत्वाची भूमिका डॉ. सचिन पुणेकर,तुषार सरोदे,प्रा.डॉ.अस्मिता जोशी, प्रा. उमेश चव्हाण,डॉ.गौरी भट,प्रा.डॉ. जोगीता पंडकर,अतुल कडू, शैलेंद्र पटेल,कौस्तुभ जाधव,श्रीमती सायली सौदणकर यांनी बजावली.

थोडक्यात जैविक आक्रमणा बाबतचा हा जागर आहे. पर्यावरण, आर्थिक व आरोग्यविषयक उपद्रवी तणांचे (वनस्पती व प्राणी) धोके लक्षात घेवून या अभिनव, पर्यावरण संवर्धन संघटनाचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे,जनजागृतीचा भाग म्हणून माबि या हरित चळवळीचे देशभर, राज्यभर, शहरभर, गावात, प्रभागात,उपशहरात, वन्यजीव संरक्षित क्षेत्रात व इतर संबधित ठिकाणी सातत्याने आयोजन केले जावे, या उपद्रवी परदेशी घटकांबाबतीत योग्य ते शासकीय धोरण असावे, लोकसहभागातून या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांचे आपल्या राष्ट्रातून समूळ उच्चाटन व्हावे.

तसेच माबिच्या माध्यमातून तण मुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत हा संदेश देखील जनमानसात रूढ करण्यात यावा या उद्देशाने जागतिक परिसंस्था पुनरुज्जीवन दशकाचे तसेच भारत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.











Add Comment