पंढरपूरात युवासेनेचे मोदी सरकारविरोधात आंदोलन; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे देशाच्या भविष्यावर आघात : पंढरपूरात युवासेनेचे जोरदार आंदोलन
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ पंढरपूरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने आंदोलन केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जुलै २०२६ : दिल्लीत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेच्यावतीने बुधवारी पंढरपूरात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
युवासेनेचे उपसचिव रणजित बागल यांनी आंदोलनादरम्यान बोलताना, विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार व अश्रुधूराचा वापर करणे ही लोकशाहीविरोधी आणि हुकूमशाही प्रवृत्ती असल्याचा आरोप केला.पेपरफुटीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असे सांगत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
रणजित बागल यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा ठाम पाठिंबा असून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी युवासेना पुढेही संघर्ष करत राहील.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख आकाश जयवंत माने, शहरप्रमुख आनंद संजय घोडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन आटकळे, सोशल मीडिया पदाधिकारी युवराज नवले,हर्षवर्धन आटकळे, प्रविण फुगारे,श्री महिमकर,नाथा कांबळे, प्रविण पवार,धनराज माळी यांच्यासह युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.











Add Comment