Maharashtra

राज्यभर पत्रकारांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी विशेष अभियान; रविंद्र बेडकिहाळ यांची मोठी घोषणा

राज्यभर पत्रकारांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी विशेष अभियान; रविंद्र बेडकिहाळ यांची मोठी घोषणा

पत्रकारांनी व्यक्तीशी नव्हे, बातमीशी बांधिलकी ठेवावी; डिजिटल युगासाठी 18 केंद्रांवर विशेष प्रशिक्षण अभियान

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या वार्षिक सभेत अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी पत्रकारांचे डिजिटल सक्षमीकरण आणि क्षमता विकासासाठी राज्यातील 18 ठिकाणी विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली. पत्रकारितेतील बदल,डिजिटल कौशल्य,माध्यम क्षेत्रातील आव्हाने आणि पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

फलटण । ज्ञानप्रवाह न्यूज,3 ऑगस्ट 2026 : पत्रकारांची बांधिलकी बातमीशी असली पाहिजे.मात्र पत्रकार व्यक्तीशी बांधिलकी जपत आहेत हा पत्रकारितेच्या मूल्यांना फार मोठा धोका आहे.पत्रकारितेतील असे धोके रोखण्यासाठी पत्रकारांना योग्य मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने तसेच माध्यमक्षेत्रात होत असलेल्या अमुलाग्र बदलत्या परिस्थितीनुसार पत्रकारांचे डिजिटल सक्षमीकरण आणि क्षमता विकास यासाठी राज्यभर विशेष अभियान राबवण्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेची 39 वी तर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली फलटण येथे संपन्न झाली त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेसाठी ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर,महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके,महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे ज्येष्ठ संचालक दिलीपसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

रविंद्र बेडकिहाळ पुढे म्हणाले की, नियोजित पत्रकार सक्षमीकरण अभियान राज्यस्तरावर राबवण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून यासाठी दोन जिल्ह्यांसाठी एक अशा प्रकारे राज्यातील 18 ठिकाणी हे अभियान आयोजित करण्यात येणार आहे.मान्यवर आणि अभ्यासू माध्यम तज्ज्ञांचे मार्गदर्शन,मराठी पत्रकारितेच्या गौरवशाली इतिहासाची माहिती सांगणारा माहितीपट,जिल्हास्तरा वरील पत्रकारितेची माहिती देणारी माहिती पुस्तिका आदी उपक्रम या अभियानाचा भाग असणार आहेत. यासह ज्येष्ठ पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र संपादक व पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, जाहिरात वितरण धोरणाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी संस्था शासन स्तरावर प्रयत्नशील असल्याचेही बेडकिहाळ यांनी नमूद केले.

मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर म्हणाले की,पूर्वी पत्रकार आणि मंत्री यांच्यात सुसंवाद असायचा जो आज बंद झाला आहे.पत्रकार परिषद घेऊन निर्णय सांगणे आता बंदच झाले असून पत्रकारांची संख्या वाढली आहे हे कारण सांगितले जात आहे. मात्र पत्रकार आणि सरकार यांच्यात संवाद राहिला पाहिजे.आज प्रत्येक मंत्र्यांकडे स्वतंत्र माध्यम यंत्रणा आहे. पत्रकारांनी जर आपली कार्यक्षमता वाढवली तर अशा माध्यम यंत्रणेमध्ये तुमची गरज निश्चित आहे.या सगळ्या बदलत्या परिस्थितीवर नियोजित विशेष अभियानात मार्गदर्शन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करुन या अभियानाच्या संकल्पाबद्दल रविंद्र बेडकिहाळ यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

पुढे बोलताना सुकृत खांडेकर यांनी स्पष्ट केले की,सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यम हे ज्ञानाचे महासागर आहेत.आजच्या पत्रकाराला किमान संगणक ज्ञान असेल तरच तो स्पर्धेत टिकू शकतो.स्पर्धेत टिकायचे असेल तर अपडेट असणे आवश्यक आहे. वाचनाची कमतरता असल्यामुळे सखोल माहिती नसते.एकांगी पत्रकारिता लोकांना आवडत नाही, त्यामुळे पत्रकारांनी दोन्ही बाजू दाखवल्या पाहिजेत. आजच्या परिस्थितीत पत्रकारितेवर पत्रकाराची उपजीविका होऊ शकत नसल्याने स्वतःचे अन्य उत्पन्नाचे स्त्रोत तयार करावेत,असे मत त्यांनी मांडले.

ज्येष्ठ संचालक दिलीपसिंह भोसले यांनी पत्रकार कल्याण निधी व संपादक संघाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सूचित केले तर रोहित वाकडे यांनी नियोजित पत्रकार क्षमता विकास अभियानाचा थोडक्यात तपशील स्पष्ट केला. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे कार्यलक्षी संचालक अमर शेंडे यांनी वार्षिक सभेचे सूत्रसंचालन व आर्थिक पत्रकांचे सादरीकरण केले.

या सभेच्या कामकाजात ज्येष्ठ संचालक माधवराव पवार, अलका बेडकिहाळ, सुहास रत्नपारखी, गजानन पारखे, बापूराव जगताप, रोहित वाकडे, प्रमोद वाणी, विशाल शहा, मयुर देशपांडे, अरुण खरात, मनिष निंबाळकर, अशोक सस्ते आदी उपस्थितांनी सहभाग नोंदवला.

सभेच्या निमित्ताने रविंद्र बेडकिहाळ यांचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या त्रिखंडात्मक चरित्राबद्दल, तर दिलीपसिंह भोसले यांचा अमृत महोत्सवाबद्दल सुकृत खांडेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.