पंढरपूरच्या यमाई तलावात पाणी सोडण्याचे निर्देश; नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांच्या मागणीला यश
यमाई तलाव भरण्याचा मार्ग मोकळा,पाणीपातळी वाढणार; विहिरी-बोअरवेलसह पर्यावरणाला मोठा दिलासा
पंढरपूरच्या यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्या मागणीला यश; विहिरी,बोअरवेल व पर्यावरणाला दिलासा.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला असताना जलाशयातील अतिरिक्त पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत होते.या पार्श्वभूमीवर पंढरपूर – सांगोला रोड परिसरातील नागरिकांसाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला यशवंतराव चव्हाण तलाव (यमाई तलाव) पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा, अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिता भगीरथ भालके यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती.
या मागणीची संबंधित विभागाने तातडीने दखल घेत यमाई तलावात पाणी सोडण्यास निर्देश केला आहे. त्यामुळे तलाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विहिरी-बोअरवेलची पाणीपातळी वाढण्यास मदत
यशवंतराव चव्हाण तलाव हा पंढरपूर शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. त्याचबरोबर पर्यटन आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही या तलावाला विशेष महत्त्व आहे.मात्र सध्या तलावात अपेक्षित पाणीसाठा नसल्याने परिसरातील विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावली होती. परिणामी नागरिकांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

तलावात पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यामुळे आता परिसरातील विहिरी, बोअरवेल तसेच इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिक आणि पशुपालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.अप्रत्यक्षपणे भूजल पातळीत वाढ होण्यास मोठा फायदा होणार आहे.तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होण्यास हातभार लागणार असल्याने पशुपालकांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
पर्यावरणासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय
यमाई तलाव हा केवळ जलसाठा नसून परिसरातील पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तलावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने जलचर,पक्षी आणि इतर जैव विविधतेसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

तलावातील पाणीसाठा वाढल्याने परिसराचा पर्यावरणीय समतोल राखण्यासही हातभार लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याच्या गरजांसोबतच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.











Add Comment