स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅममधून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन संधींची ओळख
शैक्षणिक, कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षा, रोजगार व उद्योजकतेच्या संधींची विद्यार्थ्यांना माहिती
पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बी.ए. भाग १ विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅम; शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार व करिअरच्या संधींची माहिती.
पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विशेष अधिकार प्रदत्त महाविद्यालयात बी.ए. भाग १च्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन जीवनात नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शैक्षणिक रचना, विविध विभाग, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. टी.जाधव होते.प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.समाधान माने उपस्थित होते.पदवी विभागाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत काळे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभाग, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. नियमित महाविद्यालयीन उपस्थिती, अध्ययनातील सातत्य आणि शिस्त यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
विद्यार्थी कल्याण कक्ष, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, युवा महोत्सव व सांस्कृतिक विभाग, प्लेसमेंट सेल, क्रीडा विभाग, कर्मवीर क्रीडा महोत्सव, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी संसद तसेच विविध क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींची माहिती
महाविद्यालयातील ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, कौशल्याधारित अभ्यासक्रम, उद्योजकता विकास, शिष्यवृत्ती, ग्रंथालय सुविधा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट तसेच परीक्षा व मूल्यमापन पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध शासकीय तसेच इतर क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक तयारीची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पंढरपूर शहर व परिसरातील धार्मिक, आध्यात्मिक व पर्यटन क्षेत्रासोबतच शेती व शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक व्यवसाय, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था आदी क्षेत्रांमध्ये रोजगार आणि उद्योजकतेच्या उपलब्ध संधींची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे नव्या संधी : डॉ.बी.टी. जाधव
प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात झालेले बदल तसेच विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या नव्या संधी व आव्हानांवर मार्गदर्शन केले.बदलत्या शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी कौशल्यविकास, ज्ञानवृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर परिसरातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्रातील विविध संधींचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून त्यातून रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण कराव्यात, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदलांचा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजाने सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.समाधान माने यांनी महाविद्यालयात वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. महाविद्यालयातील विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रा.डॉ.रमेश शिंदे,प्रा. दादा आरेकर, प्रा. मारुती नायकू, प्रा.डॉ.सुशील शिंदे,प्रा.डॉ. दत्तात्रय चौधरी, प्रा.डॉ. आनंद शिंदे,प्रा.डॉ. नवनाथ पिसे, प्रा. अनिल परमार, प्रा.डॉ.धनंजय साठे,प्रा.डॉ.अमोल ममलया, ग्रंथपाल प्रा.डॉ. विनया पाटील,प्रा.रियाज शेख व प्रा. सुहास कांबळे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास पदवी विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, प्रा. डॉ. गोवर्धन देकोंडा, प्रा. डॉ. दत्ता डांगे, प्रा.डॉ. दादासाहेब हाके आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.सारिका भांगे यांनी केले.आभार प्रा.डॉ.प्रशांत नलावडे यांनी मानले.











Add Comment