गादेगावातील शेतकरी गणेश शेंडगे यांच्या वीज अपघाती मृत्यूची चौकशी करा; शिवसेना युवा सेनेची मागणी
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे वीजेच्या धक्क्याने शेतकरी गणेश किरण शेंडगे यांचा मृत्यू झाला. घटनेची चौकशी, दोषींवर कारवाई आणि कुटुंबाला आर्थिक मदतीची युवा सेनेची मागणी.
शेतकऱ्याच्या वीज अपघाती मृत्यूने खळबळ; दोषींवर कारवाईसह कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे वीजेच्या धक्क्याने युवा शेतकरी गणेश किरण शेंडगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेची तातडीने चौकशी करून महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश जयवंतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विभागाच्या प्रांताधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. गादेगाव येथील गणेश किरण शेंडगे हे आपल्या शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेले असता अचानक उद्भवलेल्या वीज समस्येमुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ही घटना अत्यंत गंभीर असून, शेतकऱ्यांच्या शेतातील वीज यंत्रणेबाबत सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करून वीज बिघाडाचे नेमके कारण निश्चित करावे. संबंधित वीजवाहिनी, रोहित्र, मोटार जोडणी तसेच विद्युत यंत्रणेची योग्य देखभाल झाली होती का, याची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दोषींवर कारवाई आणि कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी
या प्रकरणात महावितरणच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.
तसेच मृत गणेश शेंडगे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमां नुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गादेगाव व परिसरातील शेतांमध्ये असलेल्या विद्युत यंत्रणेची तातडीने पाहणी करून धोकादायक वीज जोडण्या,विद्युत वाहिन्या व अन्य उपकरणांची दुरुस्ती करावी. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात,अशी मागणीही करण्यात आली.
युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित
युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश जयवंतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख फिरोज तांबोळी, तालुकाप्रमुख सुरज शिंदे, शहरप्रमुख आनंद घोडके, पंढरपूर-मंगळवेढा प्रसिद्धीप्रमुख युवराज नवले, उपतालुकाप्रमुख संस्कार आसबे यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते.
या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतातील विद्युत यंत्रणेची सुरक्षितता तपासावी,अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.











Add Comment