सोनके व तिसंगी तलाव तातडीने पाण्याने भरा; युवा सेनेचे प्रशासनाला निवेदन
पंढरपूर तालुक्यातील सोनके व तिसंगी तलाव तातडीने पाण्याने भरावेत, अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश जयवंतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली
सोनके-तिसंगी तलाव तातडीने भरा; युवा सेनेचे प्रशासनाला निवेदन, आकाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी
शेती, पिण्याचे पाणी अन् पशुधनासाठी तलाव भरण्याची मागणी; युवा सेनेचा प्रशासनाला इशारा
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील सोनके व तिसंगी येथील तलाव तातडीने पाण्याने सोडून पूर्ण क्षमतेने भरावेत,अशी मागणी शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश जयवंतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार व महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

सोनके व तिसंगी परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांची शेती, पिण्याच्या पाण्याची गरज तसेच पशुधन मोठ्या प्रमाणात या तलावांवर अवलंबून आहे. सध्या पावसाचे प्रमाण व उपलब्ध पाणी साठा लक्षात घेता या तलावांमध्ये तातडीने पाणी सोडणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्यास परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने आवश्यक आदेश देऊन सोनके व तिसंगी तलाव शक्य तितक्या लवकर भरून द्यावेत, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. मागणीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला तलावात जाऊन जलसमाधी देण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख फिरोज तांबोळी, तालुकाप्रमुख सुरज शिंदे, शहर प्रमुख आनंद घोडके, पंढरपूर- मंगळवेढा प्रसिद्धीप्रमुख युवराज नवले, उपतालुकाप्रमुख संस्कार आसबे यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते.











Add Comment