Maharashtra crimes Politics

गर्भलिंग निदानाच्या संघटित टोळीवर मोक्का कारवाई; डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून पोलिसांचे अभिनंदन

कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीवर मोक्का कारवाई. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.

गर्भलिंग निदान-गर्भपात रॅकेटला मोठा दणका;११ आरोपींवर मोक्का कारवाई

कोल्हापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑगस्ट २०२६ : बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी मोक्का (MCOCA) अंतर्गत केलेल्या कारवाईचे विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.

आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे PCPNDT व MTP कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस व आरोग्य अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत गर्भलिंग निदान, बेकायदेशीर गर्भपात व त्यामागील संघटित टोळ्यांवर केवळ PCPNDT कायद्यापुरती कारवाई न करता संघटित गुन्हेगारीचे स्वरूप आढळल्यास मोक्कासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट निर्देश व सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर करवीर तालुक्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाचा तपास करून ११ आरोपींच्या टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कायदेशीर निकषांची पडताळणी करून या कारवाईला मंजुरी दिली.गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रकरणात राज्यातील ही पहिलीच मोक्का कारवाई असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

आमदार डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कोल्हापूरच्या बैठकीत संघटित स्वरूपात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपाताच्या साखळीवर कठोर कारवाईची आवश्यकता आम्ही अधोरेखित केली होती.पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन मोक्का अंतर्गत केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे.यामुळे अशा गुन्हेगारी टोळ्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश गेला आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,पोलीस अधीक्षक नीलोत्पल व कारवाईत सहभागी सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करते आणि आभार मानते.

राज्यात अशा प्रकारे संघटित पद्धतीने गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळ्यांची माहिती संकलित करून PCPNDT, MTP तसेच आवश्यकतेनुसार मोक्काअंतर्गत कठोर कारवाईचे हे मॉडेल राज्यभर प्रभावीपणे राबवावे, अशी अपेक्षाही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.