ज्येष्ठांच्या हक्कांसाठी आमदार जयंत पाटील यांना आटपाडीकरांचे साकडे; विधेयक मंजुरीची मागणी
राजारामबापू उद्योग समूह आटपाडीत आणा; आमदार जयंत पाटील यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्या
ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित विधेयक मंजूर करण्यासाठी आमदार जयंतराव पाटील यांनी प्रयत्न करावेत, अशी आटपाडीतील ज्येष्ठांची मागणी. राजारामबापू उद्योग समूहाचे उद्योग आटपाडीत आणण्याचेही आवाहन
ईश्वरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० : ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या माध्यमातून सेवा-सुविधा देण्या बाबतचे २०२५ चे विधेयक क्रमांक ७२ तातडीने मंजूर करून त्यातील तरतुदींचा लाभ राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळावा, यासाठी जोरदार प्रयत्न करावेत, अशी मागणी आटपाडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली.यावेळी त्यांचा सत्कार करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.ज्येष्ठांचे नेते अरविंद चांडवले, नंदकुमार राक्षे, सौ.गुलशन वंजारी, दत्तात्रय मोकाशी,पोपटराव देशमुख,सुनील करडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्याबाबत आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार जयंत पाटील यांनी दिले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मागण्या
सर्व जाती-जमाती आणि धर्मातील ६० वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १० हजार रुपये मानधन किंवा पेन्शन मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने कॅबिनेट स्तरावर स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे आणि त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी.
ज्येष्ठांसाठी सामाजिक सुरक्षा, संरक्षण, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा तसेच विविध सवलती उपलब्ध करून द्याव्यात. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुरक्षा आणि संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी विशेष कायदा व आचारसंहिता तयार करावी.

बँकिंग सेवांमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून द्यावी, त्यांना मदत करण्यासाठी सामुदायिक मदतनीस नियुक्त करावेत तसेच विशिष्ट मर्यादेपर्यंत विनाअट व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ज्येष्ठांसाठी जागांचे आरक्षण, विशेष सवलती आणि सुविधा देण्याची मागणीही करण्यात आली.
राजारामबापू उद्योग समूह आटपाडीत आणण्याचे आवाहन
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर विविध संघटना आणि पदाधिकारी सातत्याने आवाज उठवत असून आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रत्येक ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती आहे.त्यांच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आटपाडीतील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी सादिक खाटीक यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे प्रलंबित विधेयक मंजूर करण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी प्रयत्न करावेत, तसेच ज्येष्ठांच्या विविध मागण्यांवर आक्रमकपणे आवाज उठवावा, असे आवाहन केले.
यासोबतच राजारामबापू उद्योग समूहाच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यात विविध उद्योग,व्यवसाय आणि विकास प्रकल्प साकारून माणदेशाच्या विकासाला चालना द्यावी, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

सातारा-सांगली जिल्ह्याच्या एकत्रित लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केलेल्या युवा राजारामबापू पाटील यांनी आटपाडीचे ज्येष्ठ नेते रस्तुमरावबापू देशमुख यांना उपाध्यक्षपद देऊन आटपाडी तालुक्याचा गौरव केला होता.याचा संदर्भ देत त्याच जिव्हाळ्याच्या भावनेतून वाळवा येथील राजारामबापू उद्योग समूहातील साखर कारखान्याचे युनिट, बँक, दूध संघाच्या शाखा, शैक्षणिक संस्था, एमआयडीसी तसेच शेतकरी,कामगार,युवक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्प आटपाडीत साकारावेत,अशी मागणी सादिक खाटीक यांनी केली.











Add Comment