Maharashtra Politics

वडापावच्या चर्चेतून पुन्हा ऐरणीवर नाशिक-पुणे रेल्वेचा मुद्दा; सत्यजीत तांबेंची रेल्वेमंत्र्यांकडे मिश्कील मागणी

वडापावच्या चर्चेतून पुन्हा ऐरणीवर नाशिक-पुणे रेल्वेचा मुद्दा; सत्यजीत तांबेंची रेल्वेमंत्र्यांकडे मिश्कील मागणी

वडापावच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. संगमनेरमार्गे रेल्वेसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती

वडापाव खाण्याची संधी तरी द्या- सत्यजीत तांबेंनी अश्विनी वैष्णवांना का केली नाशिक-पुणे रेल्वेची आठवण ?

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ ऑगस्ट २०२६ : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिना निमित्त सोशल मीडियावर वडापाव सोबत लसूण चटणी की तळलेली मिरची,असा प्रश्न उपस्थित केला. या पोस्टला उत्तर देताना काँग्रेसचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मिश्कील शैलीत पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला.

लसूण चटणी किंवा तळलेली मिरची ? दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत हा वडापाव खाण्याची संधी मिळाली पाहिजे.यासाठीच आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत,अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली.

आमदार सत्यजित तांबे यांच्या या मिश्कील प्रतिक्रियेतून मात्र नाशिक- पुणे रेल्वे मार्गाची दीर्घकाळापासून ची मागणी आणि या भागातील नागरिकांच्या भावना प्रभावीपणे समोर आल्या. रेल्वेसेवेअभावी अनेक तरुणांना शिक्षण व रोजगारासाठी घरापासून दूर राहावे लागते. थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास त्यांना प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी करून वेळेत घरी पोहोचणे शक्य होईल,असा मुद्दाही या मागणीमागे आहे.

संगमनेरमार्गे रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, यासाठी गेल्या काही काळापासून विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संगमनेरमार्गे रेल्वे मार्गाचा विचार करण्याची मागणी केली आहे.

या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनाच्या निमित्ताने नाशिक, संगमनेर, जुन्नर आणि शिरूर येथे जनआंदोलनही करण्यात आले. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी तसेच नागरिक सहभागी झाले होते.

शिक्षण,रोजगार आणि उद्योगाला मिळू शकते चालना

पुणे-नाशिक थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास नाशिक, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, मंचर, खेड, चाकण आणि पुणे या भागांतील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.या मार्गामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी,तरुणांना रोजगारा साठी तसेच उद्योजकांना व्यापार आणि उद्योगासाठी मोठी मदत होऊ शकते.

पर्यटनाच्या दृष्टीनेही नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या थेट रेल्वेचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ रेल्वे मार्गाचा नसून या संपूर्ण परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाशी जोडलेला असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

वडापावच्या निमित्ताने पुन्हा चर्चेला उधाण

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या वडापावसंदर्भातील सोशल मीडिया पोस्टला उत्तर देताना सत्यजीत तांबे यांनी कोणतीही थेट राजकीय टीका न करता आपल्या मागणीची आठवण करून दिली.वडापाव खाण्यासाठी तरी रेल्वे सुरू करा या मिश्कील अंदाजातील प्रतिक्रियेमुळे नाशिक-पुणे रेल्वेचा मुद्दा पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

वडापावच्या चर्चेतून सुरू झालेला हा संवाद अखेर आईच्या हातचे जेवण आणि घरापासून दूर असलेल्या तरुणांच्या भावनांपर्यंत पोहोचला.त्यामुळे नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी,ही मागणी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.