भाळवणीत निर्भया पथकाचे विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे; सायबर गुन्हे,पोक्सो अन् सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन
अनुचित प्रकारांना घाबरू नका, संकटात शांत राहा; निर्भया पथकाचा विद्यार्थिनींना आत्मविश्वासाचा मंत्र
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये निर्भया पथकाकडून विद्यार्थिनींना महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, सोशल मीडिया,पोक्सो कायदा, बालविवाह आणि डायल 112 बाबत मार्गदर्शन
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि,24 :- विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षितते बाबत सजग राहावे, अनुचित प्रकारांना घाबरून न जाता योग्य पद्धतीने त्यांचा सामना करावा, तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा, या उद्देशाने न्यु इंग्लीश स्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी ता.पंढरपूर येथील शाळेत पोलीस प्रशासनाच्या निर्भया पथकाच्यावतीने विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

सहा पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास निर्भया पथक अधिकारी सुप्रिया यादव , पो.कॅा निर्मला वाघमारे ,पो.कॅा शाहीन काझी, पो.कॅा शशिकांत सावंत ,लक्ष्मण कुचेकर , ॲड.विनोद गायकवाड तसेच महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.
महिला व मुलींची सुरक्षा, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम व त्यावरील कारवाई,सोशल मीडियाचे दुष्परिणाम व ऑनलाइन फसवणूक तसेच सायबर गुन्हे, बालविवाह, शिक्षणाचे महत्त्व,पोक्सो कायदा, टोल फ्री क्रमांक व डायल 112, गावातील महिलाच्या अडचणी, वाहतूक सुरक्षा व मोटार वाहन कायदा, संरक्षण करिता कराटे आदी विविध विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.

संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता शांतपणे परिस्थितीचा सामना करावा आणि कोणत्याही चुकीच्या वर्तनाला प्रोत्साहन न देता एकमेकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहा पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची तसेच उपलब्ध पोलीस मदतीची प्राथमिक माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला. या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत झाली.












Add Comment