सुमारे २० लाख रुपयांची विक्री; आता २७ ऑगस्टपर्यंत महासेल सुरू राहणार
पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या महावस्त्र महासेलला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सुमारे २० लाखांची विक्री; महासेलला २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
विठ्ठल-रुक्मिणी चरणी अर्पण केलेली महावस्त्रे आता प्रसादरूपात घरी नेता येणार; महासेलला ३ दिवसांची मुदतवाढ
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्यावतीने श्री विठ्ठल- रुक्मिणी माता तसेच परिवार देवतांच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेली महावस्त्रे भाविकांना अल्प दरात प्रसादस्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “महावस्त्र महासेल”ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महासेलला आतापर्यंत हजारो भाविकांनी भेट देऊन महावस्त्रांची खरेदी केली असून, सुमारे २० लाख रुपयांची विक्री झाली आहे.
भाविकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि महासेलला मुदतवाढ देण्याची होत असलेली मागणी विचारात घेऊन मंदिर समितीने महावस्त्र महासेलला आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा महासेल आता दि. २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांना धार्मिक व भावनिक महत्त्व असून, ही महावस्त्रे प्रसादस्वरूपात आपल्या घरी नेण्याची विशेष संधी या महासेलच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध झाली आहे.
महासेलमध्ये साड्या, ब्लाऊज पिस, चोळीखण, उपरणे, शाल, शेला, धोतर, सोहळे, लुंगी, टॉवेल, टोपी, नॅपकीन आदी विविध प्रकारची महावस्त्रे उपलब्ध आहेत. भाविकांच्या सोयीसाठी महावस्त्रांचे प्रकार व दरानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. साड्या ₹१०५ ते ₹७,१००, शाल ₹१०५ ते ₹३१५, शेला ₹१०५ ते ₹१,०५०,सोहळे व उपरणे ₹ २१० ते ₹ ३,१०० तर धोतर ₹ २१० ते ₹१,०५० या दरात उपलब्ध आहेत. तसेच ब्लाऊज पिस,टॉवेल, टोपी,नॅपकीन आदी वस्तू ₹ १०५ पासून तर चोळीखण व लुंगी प्रत्येकी ₹ २१० दराने उपलब्ध आहेत.
महासेलमध्ये विविध प्रकारच्या महावस्त्रांचा मोठ्या प्रमाणात साठा असून प्राप्त झालेल्या महावस्त्रांचे नियमानुसार विगतीकरण, मूल्यांकन व पॅकिंग करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.दि 19 ऑगस्ट रोजी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर) यांच्या हस्ते महा सेलचा शुभारंभ करण्यात आला होता.
महावस्त्र विभागाची जबाबदारी सहाय्यक विभाग प्रमुख एकनाथ दर्शने व विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे . त्यांच्या मार्गदर्शनात महावस्त्रांची योग्य पद्धतीने वर्गवारी व विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी महावस्त्रे भाविकांना श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथील स्वतंत्र स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत होती.मात्र अधिक मास व आषाढी यात्रेच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात महावस्त्रे प्राप्त झाल्याने त्यांचा अधिकाधिक भाविकांना लाभ मिळावा, या उद्देशाने दि. १९ ऑगस्टपासून श्री संत तुकाराम भवन तिसरा मजला पंढरपूर येथे विशेष महावस्त्र महासेल आयोजित करण्यात आला आहे.

भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आता हा महासेल दि. २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेले महावस्त्र प्रसादस्वरूपात आपल्या घरी नेण्याची ही विशेष संधी भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले आहे.











Add Comment