मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा १० हजारांपर्यंत नेत्र शस्त्रक्रिया : प्रणव परिचारक
पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी यंदा १० हजारांपर्यंत नेत्रशस्त्रक्रियांचे उद्दिष्ट. ४३९० रुग्णांची तपासणी, २१०० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र
सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आरोग्यसेवेचा मोठा संकल्प; २१०० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी समाजसेवेचा दिलेला वारसा पुढे नेत पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून, यंदाच्या वर्षी तब्बल १० हजार नागरिकांना मोतीबिंदूमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,अशी माहिती पांडुरंग परिवाराचे युवानेते प्रणव परिचारक यांनी दिली.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच करकंब ग्रामीण रुग्णालय येथे मोतीबिंदू तपासणी, लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. करकंब, कासेगाव, रोपळे, तुंगत, पुलुज, खर्डी, रांजणी, गादेगाव,उंबरे पागे आणि भाळवणी या ठिकाणी ही शिबिरे घेण्यात आली.
या आरोग्य अभियानाला तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही पाठिंबा दिला.माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी व नेत्यांनी शिबिरांना भेट देऊन नागरिकांच्या आरोग्य तपासणीची माहिती घेतली आणि पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या अभियानात सहभाग नोंदविला.
पुणे येथील एच.व्ही.देसाई रुग्णालयाच्या अंतर्गत शंकरराव साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची नेत्र तपासणी केली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत ४ हजार ३९० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. तपासणीत सुमारे २ हजार १०० रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.
या पात्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असून, पुढील दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या सहा वर्षांपासून प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून विविध नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले जात आहे.या उपक्रमांतून आतापर्यंत सुमारे ८ हजार ९०० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यंदाच्या शिबिरातील सुमारे २ हजार १०० पात्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा आकडा १० हजारांच्या आसपास पोहोचणार आहे.त्यामुळे पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.
या शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बिनाटाक्याच्या पद्धतीने लेन्ससह आणि लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोफत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांच्या गावातून सोलापूर आणि पुणे येथील संबंधित रुग्णालयांपर्यंत ने-आण करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन प्रणव परिचारक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.केवळ मोतीबिंदू शस्त्रक्रियाच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर नेत्रतपासणी आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणाला सामाजिक आणि आरोग्यसेवेची जोड देत सुरू करण्यात आलेल्या या अभियानामुळे हजारो नागरिकांना दृष्टीचा लाभ मिळणार असून पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या संकल्पाला यंदा मोठी चालना मिळणार आहे.











Add Comment