पंढरपुरात पुन्हा अतिक्रमण केल्यास थेट कारवाई; मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा इशारा
सार्वजनिक रस्ते, फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई; पंढरपूर नगरपरिषदेचा कडक इशारा
पंढरपूर शहरात अतिक्रमणमुक्त मोहीम सुरूच; सार्वजनिक रस्ते, फुटपाथ व नगरपरिषदेच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण केल्यास पूर्वसूचना न देता कारवाई करण्याचा मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा इशारा
पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि,11: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ आणि महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम,१९६५ मधील तरतुदीच्या अधिन राहुन पंढरपूर शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ तसेच नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे विशेष अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे काढण्यात आलेली आहेत. सदर ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास कोणतीही पुर्व सूचना न देता अतिक्रमण काढण्यात येईल अशा सूचना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिल्या.

आषाढी यात्रा कालावधहीत वारकरी भाविकांना तसेच नागरिकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पंढरपूर शहरात अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली होती.आषाढी वारीनंतर शहरातील ज्या ठिकाणा वरील अतिक्रमणे पथकाद्वारे काढून टाकण्यात आलेली आहेत व सदरची जागा अतिक्रमण मुक्त केलेली आहे.अशा ठिकाणी परत अतिक्रमणधारकांकडून नव्याने व्यवसाया साठी खोकी व कायम स्वरूपी शेड टाकून अतिक्रमण करणेत येत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील सार्वजनिक रस्त्यावर,फुटपाथवर, न.प.जागेवर नव्याने अतिक्रमण करणाऱ्यांना सूचित करण्यात येते की,आपले अतिक्रमण पंढरपूर नगरपरिषदेमार्फत कोणतीही सूचना न देता पोलीस बंदोबस्तात विशेष अतिक्रमण पथकाद्वारे काढून घेण्यात येईल व या दरम्यान होणाऱ्या नुकसानीस नगरपरिषद जबाबदार असणार नाही. ती संबधितांची वैयक्तिक जबाबदारी राहणार आहे.
तसेच कारवाई दरम्यान सार्वजनिक सुरक्षिततेस बाधा आणलेस अथवा सदर प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अन्वये कायदेशीर कारवाई करणेत येईल. तरी पंढरपूर शहर अतिक्रमण मुक्त व सुरक्षित ठेवून सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, असे आवाहनही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.












Add Comment