Maharashtra सामाजिक

राजगडनंतर सिंहगडवर असभ्य प्रकार; गड-किल्ल्यांच्या अस्मितेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

राजगडनंतर सिंहगडवर असभ्य प्रकार; गड-किल्ल्यांच्या अस्मितेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

गडकोट म्हणजे पर्यटन नाही, आमचे देवालय!राजगड-सिंहगड -रायरेश्वरच्या सुरक्षेसाठी तीन मोठ्या मागण्या

राजगड,सिंहगड आणि रायरेश्वर वरील कथित असभ्य प्रकारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गड -किल्ले संवर्धन सेलचे हवेली पोलीस व सिंहगड वनविभागाला निवेदन

राजगड,सिंहगड आणि रायरेश्वर वरील कथित असभ्य प्रकारां विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गड -किल्ले संवर्धन सेलचे हवेली पोलीस व सिंहगड वनविभागाला निवेदन

पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि स्वराज्याच्या संघर्षाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांवर वाढत असलेल्या असभ्य प्रकारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल आक्रमक झाला आहे. राजगड, सिंहगड आणि रायरेश्वर या ऐतिहासिक स्थळांवरील अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी हवेली पोलीस स्टेशन आणि सिंहगड वनविभागाला लेखी निवेदन देण्यात आले.

गेल्या रविवारी राजगडावर डान्सचा प्रकार समोर आल्यानंतर आता सिंहगडावर हाणामारी आणि असभ्य वर्तनाचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर परिसरातही अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याबद्दल शिवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

‘गडकोट म्हणजे पर्यटनस्थळ नव्हे, आमचे देवालय’

गड-किल्ले हे केवळ पर्यटनाची ठिकाणे नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि स्वराज्याच्या पराक्रमाचे प्रतीक आहेत. ज्या भूमीवर पूर्वजांनी रक्त सांडून स्वराज्य उभे केले, त्या पवित्र स्थळी असभ्य प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

गड-किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी तीन प्रमुख मागण्या

गड-किल्ल्यांवरील वाढत्या असामाजिक प्रकारांना आळा घालण्यासाठी संघटनेने प्रशासनाकडे प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

1. असभ्य प्रकार करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी.
2. राजगड, सिंहगड आणि रायरेश्वर येथे महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा कक्ष तसेच CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी.
3. गडांवर असामाजिक कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी.

निवेदनानंतर पोलिस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित प्रकरणांमध्ये लवकरात लवकर ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

गडांची अस्मिता जपण्यासाठी शिवप्रेमींनी एकत्र यावे

गड-किल्ल्यांची ऐतिहासिक ओळख, पावित्र्य आणि अस्मिता जपण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासोबतच तेथे येणाऱ्या पर्यटकांकडून शिस्त आणि जबाबदार वर्तनाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेलचे अध्यक्ष महेंद्र तानाजी देवघरे तसेच शिवभक्त भगवान हानमगर पुणे,पुणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव,पुणे जिल्हा सचिव तानाजी चिकणे, आणि पुणे जिल्हा संघटक शंकर भाऊ चिकणे आदी उपस्थित होते.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.