मारापूरच्या दूध डेअरीवर अन्न सुरक्षा विभागाचा छापा; मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थ जप्त, तालुक्यात खळबळ
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ ? मारापूर येथील डेअरीवर धाड; मुदतबाह्य दही, ताक, लस्सी जप्त, चौकशी सुरू
सोलापूर अन्न सुरक्षा विभागाने मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथील नेचर दूध डेअरीवर छापा टाकून मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थ जप्त केले. अज्ञात तक्रारीनंतर झालेल्या या कारवाईमुळे दूध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पुढील कारवाईसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथील नेचर दूध डेअरीवर सोलापूर अन्न सुरक्षा विभागाने अचानक छापा टाकत मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थ जप्त केले.या कारवाईमुळे परिसरातील दूध डेअरी चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अन्न सुरक्षा विभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या डेअरी मध्ये तयार करण्यात येणारे दही, ताक,लस्सी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ मुदतबाह्य झाल्यानंतरही विक्रीसाठी ठेवले जात असल्याची अज्ञात तक्रार सोलापूर अन्न सुरक्षा विभागाकडे करण्यात आली होती.या तक्रारीची दखल घेत राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई आणि अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम यांच्या पथकाने अचानक धाड टाकली.

कारवाईदरम्यान मुदतबाह्य असल्याचा संशय असलेले विविध दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. संबंधित नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाने दिली.
दरम्यान कारवाईत नेमका किती मुद्देमाल जप्त करण्यात आला किंवा त्याची किंमत किती होती,याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे या कारवाईबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

अन्न सुरक्षा विभागाकडून मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागातील दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासणी अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.विशेषतः दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या संभाव्य भेसळीवर लक्ष ठेवून नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संबंधित डेअरी किंवा मालकांविरुद्धचे आरोप हे अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाई आणि प्राप्त तक्रारीवर आधारित आहेत. अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळा अहवाल व पुढील अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होईल.











Add Comment