केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीचा गौरव; १४ ऑगस्टला मुंबईत भव्य नागरी सत्कार
रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या दशपूर्तीनिमित्त मुंबईत भव्य सोहळा;मुख्यमंत्री फडणवीसांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाच्या १० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दी निमित्त १४ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भारत सरकार मधील मंत्रीपदाच्या १० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशतर्फे १४ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ,पालकमंत्री आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षते खाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत केंद्र सरकारमध्ये सलग तीन वेळा सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा मान रामदास आठवले यांना मिळाला आहे. सामाजिक न्याय मंत्रालयात सलग तीन कार्यकाळ राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा त्यांचा विक्रम असून, त्यांच्या दशकभराच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यास मुंबई,ठाणे आणि परिसरातील आंबेडकरी समाजबांधव तसेच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.











Add Comment