नंदुरबार बाल लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास व्यापक करा; पीडित मुलांची गोपनीयता जपा –आमदार डॉ. नीलम गोऱ्हे
नंदुरबार प्रकरणात संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा शोध घ्या;स्वतंत्र WhatsApp क्रमांकाची मागणी – डॉ.नीलम गोऱ्हे
नंदुरबार बाल लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास व्यापक करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी. पीडित मुलांची गोपनीयता, सुरक्षित समुपदेशन आणि स्वतंत्र WhatsApp क्रमांकाची व्यवस्था करण्याचे आवाहन.
Nandurbar crime news : पुणे ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ ऑगस्ट २०२६ : नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलांशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ ,छायाचित्रे एका २२ वर्षीय युवकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अनेक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा संशय असल्याने तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा शोध घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या विधान परिषद सदस्या आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
पीडित मुले अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख, छायाचित्रे, शाळा किंवा इतर वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवावी. त्यांचे जबाब पोक्सो कायद्यानुसार बालस्नेही वातावरणात, प्रशिक्षित समुपदेशकांच्या उपस्थितीत नोंदवावेत आणि आवश्यक असल्यास सुरक्षित वाहतुकीचीही व्यवस्था करावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
मोबाईल, व्हिडिओ, छायाचित्रे आणि अन्य डिजिटल पुराव्यांची सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सखोल तपासणी करून इतर पीडित, आरोपी, मध्यस्थ किंवा सूत्रधारांचा शोध घ्यावा. तसेच सन २०२२ ते २०२६ या कालावधीत अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत का, याचाही तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी नंदुरबार पोलिसांनी स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करावा, ज्यावर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक गोपनीयपणे माहिती देऊ शकतील. माहिती देणाऱ्याची व पीडितांची ओळख पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याबाबत पोलिसांनी जनतेला विश्वास द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

अनेक वर्षे भीती आणि मानसिक त्रास सहन करणाऱ्या पीडित मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास निष्पक्ष, संवेदनशील आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावा. तसेच पीडितांना कायदेशीर मदतीबरोबरच सातत्यपूर्ण मानसोपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.












Add Comment