विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून शिक्षण घ्यावे; नंदेश्वरमध्ये दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
ध्येय,शिस्त आणि संस्कारांशिवाय यश अशक्य; नंदेश्वर येथे नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदेश्वर येथे आयोजित प्रेरणादायी व्याख्यानात दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना आई – वडील, शिक्षकांचा सन्मान राखत ध्येयवादी शिक्षण घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात शिक्षण,संस्कार, चारित्र्य आणि समाजाप्रती जबाबदारी यावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
नंदेश्वर | ज्ञानप्रवाह न्यूज: आई- वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात.त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या,त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल असे कार्य करा तसेच शिक्षकांचा सन्मान राखणे,चांगले संस्कार जोपासणे, समाजाप्रती जबाबदारीची भावना ठेवणे आणि चारित्र्य संपन्न नागरिक बनणे हीच खरी शिक्षणाची ओळख आहे,असे मार्गदर्शन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी केले.

स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त बहुजन गौरव प्रतिष्ठान, समाई फाउंडेशन तसेच श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नंदेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, माजी उपसरपंच वसंत बंडगर, प्राचार्य विठ्ठल एकमल्ली, माजी शिवसेना तालुका प्रमुख अशोक चौंडे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे, बागडेबाबा दुध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे,आप्पासाहेब मेटकरी, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष बजरंग चौगुले, दामाजी सलगर, महादेव ढोणे,प्रमोद शिवशरण शिवसेना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे,श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर, आबासाहेब पाटील,नामदेव डांगे आदी उपस्थित होते.
आजचा विद्यार्थी आणि उद्याचे भविष्य या विषयावर बोलताना नितीन चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना वर्तमान, भूतकाळ व भविष्यातील बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. येणारा काळ अत्यंत आव्हानात्मक असून स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजक तथा बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. बहुजन समाजाने महापुरुषांचे विचार आचरणात आणून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, शिक्षण हाच समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नितीन चंदनशिवे यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हे व्याख्यान अत्यंत प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ मेटकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुलिंग दोलतडे यांनी केले.

ॲड.बापूसाहेब मेटकरी यांचे चंदनशिवे यांनी केले कौतुक तसेच आई-वडिलांच्या पुण्यस्मरणाला व्याख्यानासारखा कार्यक्रम घेऊन ॲड.बापूसाहेब मेटकरी यांनी समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचेही यावेळी चंदनशिवे म्हणाले.ॲड.मेटकरी हे महापुरुषांच्या विचारांचे पाईक आहेत. आजच्या समाजाला पुढे नेण्यासाठी महापुरुषांच्या विचाराची गरज आहे हे हे मेटकरी यांनी ओळखून ते समाजाला पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत त्यांच्या या कार्यासाठी त्यांना सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे. असे आवाहन यावेळी बोलताना चंदनशिवे यांनी केले. तसेच बापूसाहेब मेटकरी यांनी नंदेश्वर येथील श्री माऊली पतसंस्थेत मंगळवेढा तालुक्यातील श्री.बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नंदेश्वर,शारदा सिद्धनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पाटखळ मेटकरवाडी, श्री.कामसिद्धी विद्यालय खुपसंगी,जुनोनी माध्यमिक विद्यालय जुनोनी या चार शाळांच्या नावाने ठराविक रक्कम ठेवली आहे. या रकमेचे व्याजरूपी येणारे पैसे वरील शाळातील दहावीत प्रथम क्रमांकाने जो मुलगा उत्तीर्ण होईल त्याला बक्षीस दिले जाईल या संकल्पनेचेही कौतुक यावेळी चंदनशिवे यांनी बोलताना केले.











Add Comment