पंढरपूर ते रशिया सायकल सफर; दिगंबर भोसले म्हणाले,अनेक गोष्टी अनुभवल्या आणि शिकायलाही मिळाल्या
रशियात भारतीय राजदूतांची भेट अन् भारत-रशिया मैत्रीचा संदेश; दिगंबर भोसले यांचा अनोखा सायकल प्रवास
पंढरपूरचे सायकलपटू दिगंबर भोसले यांची रशिया सायकल सफर; भारत-रशिया मैत्रीचा संदेश,भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट आणि रशियातील अनुभव
पंढरपूर ते रशिया सायकल सफर; भारत-रशिया मैत्रीचा संदेश देताना दिगंबर भोसले यांचा अनोखा अनुभव
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : भारत -रशिया मैत्री अधिक दृढ व्हावी आणि दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये मानवी मूल्ये, सामंजस्य व मैत्रीचा संदेश पोहोचावा या उद्देशाने पंढरपूर येथून रशियापर्यंत सायकल सफरीवर गेलेले सायकलपटू दिगंबर बाबूराव भोसले यांनी या प्रवासात अनेक अनुभव घेतले.प्रवासादरम्यान रस्त्यातील विविध ठिकाणे, नागरिकांचा प्रतिसाद, ऐतिहासिक वास्तू तसेच भारतीय दूतावासाचे सहकार्य यामुळे ही सफर संस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.
भारत-रशिया-भारत मैत्रीच्या उद्देशाने सायकलपटू दिगंबर बाबूराव भोसले आणि अशोक कुमार हे रशियात अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते.या दौऱ्यादरम्यान ३ ऑगस्ट रोजी भारताचे रशियातील राजदूत विनय कुमार यांची दोन्ही सायकलपटूंनी भेट घेतली.
मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग शहरांमध्ये मानवी मूल्ये व परस्पर सामंजस्य वाढविण्याच्या उद्देशाने सायकल चालवल्याबद्दल राजदूत विनय कुमार यांनी दोन्ही सायकलपटूंचे अभिनंदन केले. त्यांच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले.
भोसले म्हणाले,रशियातील विविध ठिकाणी भारत-रशिया मैत्रीबाबत चर्चा केली असता तेथील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.भारत आणि रशियातील मैत्री अधिक दृढ व्हावी, अशा शुभेच्छा अनेक नागरिकांनी दिल्या.ही सायकल सफर कायम स्मरणात राहणारी आहे.
भारतीय राजदूतांच्या भेटीसाठी विशेष सहकार्य
भारताचे राजदूत विनय कुमार यांच्या भेटीसाठी त्यांचे पीए अशोक दिबिबा यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे भोसले यांनी सांगितले. त्यांनी या भेटीसाठी विशेष रस घेतल्याने दोन्ही भारतीय सायकलपटूंची राजदूतांशी भेट घडून आली. तसेच मॉस्को येथील भारतीय दूतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही सायकल सफरी दरम्यान मोलाचे सहकार्य मिळाले.

रशियाच्या इतिहासाचीही घेतली माहिती
रशियातील प्रवासादरम्यान महिला गाईड ऐना यांच्या माध्यमातून परिसराची माहिती घेता आली. तसेच महिला गाईड तमारा यांनी ऐतिहासिक पुतिन पॅलेस, प्रेसिडेंट पॅलेस, चर्च आणि क्रेमलिन फोर्ट याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यामुळे सायकल सफरीसोबत रशियाचा इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाल्याचे भोसले यांनी सांगितले.

शुद्ध शाकाहारी भोजनाचीही सोय
रशियात गेल्यानंतर भारतीय सायकलपटूंना शुद्ध शाकाहारी भोजन मिळण्याबाबत कोणतीही अडचण आली नाही. स्थानिक पातळीवर मिळालेल्या सहकार्यामुळे आहाराचीही चांगली व्यवस्था झाल्याचे दिगंबर बाबूराव भोसले यांनी सांगितले.
पंढरपूरपासून सुरू झालेली ही सायकल सफर केवळ साहसाचा प्रवास न राहता भारत-रशिया मैत्री, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर सद्भावनेचा संदेश देणारी सफर ठरल्याची भावना भोसले यांनी व्यक्त केली.












Add Comment