स्त्री फक्त आई, पत्नी किंवा मुलगी नाही; पुण्यात राहुल गांधींचा थेट प्रहार
पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींचे महिलांच्या स्वातंत्र्यावर भाष्य; मनुस्मृतीतील विचारांवर टीका,ब्रेक द केजचा संदेश आणि महिलांना स्वतंत्र ओळख देण्याचे आवाहन
ब्रेक द केज- राहुल गांधींचा महिलांना संदेश; म्हणाले प्रत्येक महिलेचे स्वतःचे स्वप्न आणि ओळख
पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिलांच्या स्वतंत्र अस्तित्व, स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यावर परखड भाष्य केले. पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेज ग्राऊंडवर आयोजित छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महिलांकडे केवळ आई, पत्नी किंवा मुलगी या कौटुंबिक नात्यांतून पाहण्याच्या सामाजिक दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित केला. तसेच मनुस्मृतीतील स्त्रीच्या स्वातंत्र्याबाबतच्या विचारसरणीचा संदर्भ देत त्यावर टीका केली.
महिलांची ओळख नात्यांच्या चौकटीपलीकडे
राहुल गांधी म्हणाले की,पुरुषांशी चर्चा करताना महिलांकडे अनेकदा मुलगी, पत्नी किंवा आई अशा भूमिकांमधून पाहिले जाते. या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी महिलेची ओळख केवळ या नात्यांपुरती मर्यादित असू शकत नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.
आज देशातील महिला खेळाडू, उद्योजिका,व्यावसायिक, वैज्ञानिक, कलाकार आणि विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. त्यामुळे महिलांना त्यांच्या कर्तृत्व, स्वप्न आणि व्यक्तिमत्त्वाच्या आधारे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मनुस्मृतीतील विचारांचा दाखला देत टीका
महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा मांडताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीतील पारंपरिक विचारांचा संदर्भ दिला. त्यांच्या मते, स्त्रीने बालपणी वडिलांच्या, तारुण्यात पतीच्या आणि पतीच्या मृत्यूनंतर मुलांच्या अधीन राहावे, अशी विचारसरणी मांडली गेली आहे.
या विचारसरणीवर टीका करताना त्यांनी महिला स्वतःच्या निर्णय क्षमतेने आणि स्वावलंबनाने जगू शकतात, यावर भर दिला. महिलांना नियंत्रणात ठेवण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

ब्रेक द केज चा संदेश
या कार्यक्रमाची संकल्पना Break the Cage अशी होती.यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना उद्देशून प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि अद्वितीय असल्याचा संदेश दिला.
प्रत्येक महिलेचे स्वतःचे स्वप्न, स्वतःची दृष्टी आणि आयुष्या बद्दलची स्वतःची कल्पना असते. त्यामुळे समाजाने महिलांच्या स्वप्नांना मर्यादा घालण्याऐवजी त्यांना स्वतःची दिशा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

महिलांवरील नियंत्रणाचे चार प्रकार
समाज महिलांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करतो, यावरही राहुल गांधी यांनी भाष्य केले.त्यांच्या मते महिलांवरील नियंत्रणाच्या प्रक्रियेत हिंसा, अनादर,वेळ आणि नियंत्रण अशा विविध माध्यमांचा वापर होतो.
काही वेळा हे नियंत्रण थेट बंधनाच्या स्वरूपात नसते तर तुमच्या काळजीपोटी हे सांगत आहोत अशा स्वरूपात ते महिलांवर लादले जाते, असे त्यांनी नमूद केले.
भारताची सर्वात मोठी ताकद महिलांची स्वप्ने
भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे, असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी देशातील महिलांच्या अनेक कोटी स्वतंत्र प्रवास, कल्पना आणि स्वप्नांकडे लक्ष वेधले.
महिला अधिक संवेदनशील, सौम्य, सहृदय आणि दूरदृष्टीने विचार करणाऱ्या असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांच्या या क्षमतेला देशाच्या विकासाशी जोडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना केवळ संरक्षणाची गरज असलेला घटक न मानता देशाच्या निर्णयप्रक्रिया, अर्थव्यवस्था, शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक परिवर्तनात नेतृत्व करणारी स्वतंत्र शक्ती म्हणून पाहण्याची गरज असल्याचा संदेश या संवादातून देण्यात आला.











Add Comment