Maharashtra सामाजिक सायबर अवेअरनेस

गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता, पीडितांबाबत कमाल संवेदनशीलता हवी : विजया रहाटकर

महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी झिरो टॉलरन्स सोबत संवेदनशीलता जपावी; विजया रहाटकर यांचे आवाहन

सायबर गुन्हे,AI फसवणूक आणि बनावट व्हिडिओंवर पोलिसांची नजर; 350 अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

महिला सुरक्षेसाठी गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता आणि पीडितांबाबत संवेदनशीलता आवश्यक असल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले.सायबर गुन्हे,AI फसवणूक व डिजिटल आर्थिक गुन्ह्यांविरोधात पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले

छत्रपती संभाजीनगर| जिमाका,दि. २२ ऑगस्ट २०२६ : महिलांची सुरक्षा हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा विषय नसून सुशासनाचा महत्त्वाचा निकष आहे. त्यामुळे गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारतानाच पीडित महिलांशी कमाल संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शक्ती व सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव, महिला गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पीडित महिलेचे म्हणणे शांतपणे ऐकणे गरजेचे

विजया रहाटकर यांनी सांगितले की, केवळ तक्रार स्वीकारणे किंवा एफआयआर दाखल करणे एवढ्यावर पोलिसांचे कर्तव्य संपत नाही. पीडित महिलेला वन स्टॉप सेंटर, संरक्षण अधिकारी आणि मोफत कायदेशीर मदतीची माहिती देऊन संबंधित यंत्रणांशी जोडून देणे आवश्यक आहे.

पीडित महिलेबाबत कोणताही पूर्वग्रह ठेवू नये. तिला पुरेसा वेळ देऊन तिचे म्हणणे मध्येच न तोडता ऐकून घेतले पाहिजे. आघातामुळे घटनेचा क्रम सांगताना महिलेला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष न काढता तिच्याशी सन्मानपूर्वक वागणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सायबर गुन्हे आणि AI फसवणुकीचे नवे आव्हान

बदलत्या तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचे स्वरूपही वेगाने बदलत आहे. सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट चित्रफिती आणि डिजिटल आर्थिक फसवणूक यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि वैज्ञानिक तपास पद्धतींचा प्रभावी वापर करावा, असे रहाटकर यांनी सांगितले.

महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देणेही तितकेच आवश्यक आहे. प्रत्येक तक्रारीचा निष्पक्ष आणि वेळेत तपास करून पीडितेला आवश्यक आधार देण्याची भूमिका पोलिसांनी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.

पोलीस ठाणे हे पीडितेसाठी सरकारचे पहिले द्वार

राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन यांनी सांगितले की, पीडित महिला जेव्हा पोलीस ठाण्यात येते, तेव्हा पोलीस हे तिच्यासाठी सरकारचे पहिले द्वार असतात. त्यामुळे तिचे म्हणणे पूर्वग्रह न ठेवता संवेदनशीलपणे ऐकणे आवश्यक आहे.

तक्रार दाखल करण्यास विलंब झाला म्हणून पीडितेवर प्रश्न उपस्थित करू नयेत किंवा बळजबरीने तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करून कायदेशीर कर्तव्य पार पाडतानाच पीडितेचा सन्मान राखला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी तांत्रिक क्षमता वाढविण्याची गरज

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे सांगितले. अशा गुन्ह्यांचा प्रभावी तपास करण्यासाठी पोलिसांची तांत्रिक क्षमता वाढविणे आवश्यक असून, दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी आधुनिक तपास पद्धतींचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सायबर गुन्ह्यांच्या पीडितांना तातडीने मदत मिळण्यासाठी सक्षम प्रतिसाद व्यवस्था निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तांत्रिक कौशल्यासोबतच पीडितांशी संवेदनशील संवाद साधणारी ‘पीडित-केंद्रित’ पोलीस कार्यपद्धती स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

३५० पोलीस अधिकारी-अंमलदार प्रशिक्षणात सहभागी

या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीणसह जालना, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि रेल्वे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.

सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि महिला मदत कक्ष अर्थात भरोसा सेलमधील १५० पोलीस अधिकारी आणि २०० पोलीस अंमलदार, असे एकूण ३५० पोलीस कर्मचारी या क्षमतावृद्धी प्रशिक्षणात सहभागी झाले.

महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संवेदनशील पोलीसिंग यांचा समन्वय साधल्यास पोलीस व्यवस्था अधिक जबाबदार, व्यावसायिक आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

महत्त्वाचा संदेश

सुरक्षित महिला म्हणजे सक्षम समाज आणि सक्षम समाज म्हणजे सक्षम राष्ट्र’ या भूमिकेतून महिला सुरक्षा, सायबर गुन्हे प्रतिबंध आणि पीडित-केंद्रित पोलीसिंग अधिक मजबूत करण्यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.