आषाढी सप्तमीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत दुमदुमला वारकरी भक्तांचा प्रश्न; पंढरपुरातील मध्यप्रदेश सदन पुन्हा सुरू करण्याची आमदार अर्चना चिटणीस यांची मागणी
मध्यप्रदेश सदनाचे जीर्णोद्धार करून पर्यटन माहिती व सुविधा केंद्र म्हणून विकसित करण्याची मागणी; राज्य सरकारकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन
पंढरपूरातील मध्यप्रदेश सदन पुन्हा सुरू होणार ? आमदार अर्चना चिटणीस यांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा
बर्हाणपूर मध्यप्रदेश | ज्ञानप्रवाह न्यूज | दि.२० जुलै २०२६ : आषाढी शुद्ध सप्तमीच्या पवित्र दिवशी मध्यप्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री अर्चना चिटणीस (दीदी) यांनी पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सुविधांशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नियम १३८(१) अंतर्गत लक्षवेधी सूचनेद्वारे पंढरपूर येथील मध्यप्रदेश सदनाचे संरक्षण, जीर्णोद्धार, पुनर्संचालन तसेच मध्यप्रदेश पर्यटन माहिती व सुविधा केंद्र म्हणून विकास करण्याची मागणी केली.
अर्चना चिटणीस यांनी सभागृहात सांगितले की,वर्ष २००३ मध्ये मध्यप्रदेश शासनाने पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या निवास व मूलभूत सुविधांसाठी मध्यप्रदेश सदन उभारले होते.मात्र अनेक वर्षे पुरेशा देखभालीअभावी ही इमारत जीर्ण झाली असून तिचा योग्य वापर होत नाही.दरवर्षी मध्यप्रदेशा तील हजारो-लाखो वारकरी पंढरपूरला दर्शनासाठी येत असल्याने त्यांच्या सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानजनक निवासाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की,त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संयुक्त संचालक पी. एस. मालवीय यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय आंतरविभागीय तपासणी पथकाने सदनाची पाहणी केली. या पथकाने आवश्यक दुरुस्ती व जीर्णोद्धारा नंतर मध्यप्रदेश सदन पुन्हा सुरू करता येईल, असा अहवाल दिला आहे. तसेच, इमारतीचे मालकी हक्क मध्यप्रदेश शासनाकडे कायम ठेवून स्थानिक सक्षम संस्थेमार्फत व्यवस्थापन करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
अर्चना चिटणीस यांनी सरकारकडे मध्यप्रदेश सदनाचे तातडीने नूतनीकरण करून ते आधुनिक सुविधांनी सुसज्ज मध्यप्रदेश पर्यटन माहिती व सुविधा केंद्र म्हणून विकसित करण्याची मागणी केली. यामुळे वारकरी भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील तसेच मध्यप्रदेशातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांचा प्रभावी प्रचार होईल, असे त्यांनी सांगितले.
यावर उत्तर देताना मध्यप्रदेशचे संस्कृती, पर्यटन, धार्मिक न्यास व धर्मस्व (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री धर्मेंद्र भावसिंह लोधी यांनी सांगितले की, मध्यप्रदेश सदनाच्या बांधकामासाठी व वेळोवेळी दुरुस्तीसाठी विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तपासणी समितीचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर इमारतीची दुरुस्ती, देखभाल आणि भाविकांच्या सुविधांबाबत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येत असून, सदनाचे संचालन शासनाच्या मालकी व नियंत्रणाखालीच करण्यात येईल.
अर्चना चिटणीस यांनी विश्वास व्यक्त केला की, तपासणी समितीच्या शिफारशींनुसार शासन लवकरच निर्णय घेऊन मध्यप्रदेश सदन पुन्हा सुरू करेल. त्यामुळे आषाढी वारीसह वर्षभर पंढरपूरला येणाऱ्या मध्यप्रदेशातील लाखो भाविकांना सन्मानजनक निवास, दर्जेदार सुविधा आणि मध्यप्रदेश शासनाच्या सेवाभावाचा अनुभव मिळेल.









Add Comment