india

हिमालयात निसर्गाचा कहर! नेपाळ -तिबेट सीमेवर महापुराने गावे वाहून गेली,भारतातही हाय अलर्ट

नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या प्रलयंकारी महापुराने हाहाकार

नेपाळमध्ये प्रलयंकारी महापूर; १६० हून अधिक मृत्यू,अनेक घरे व पूल वाहून गेले, १०० हून अधिक भारतीय पर्यटकांसह शेकडो बेपत्ता

नेपाळमध्ये २६ ऑगस्टला आलेल्या प्रलयंकारी फ्लॅश फ्लडमध्ये १६० हून अधिक मृत्यू, शेकडो बेपत्ता. हिमनदी कोसळल्याने महापूर आल्याचा तज्ज्ञांचा अंदाज; रासुवा जिल्ह्यात मोठा विध्वंस.

हिमालयात निसर्गाचा कहर! नेपाळ -तिबेट सीमेवर महापुराने गावे वाहून गेली,भारतातही हाय अलर्ट

काठमांडू / रसुवा : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने हिमालयीन भागात अक्षरशः हाहाकार माजवला आहे.नेपाळ-तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यासह अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला असून घरे, रस्ते, पूल आणि वीज प्रकल्प पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले आहेत.नेपाळ आणि तिबेटमध्ये मिळून मृतांचा आकडा किमान १६० वर पोहोचला असून शेकडो नागरिक व पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत.नेपाळच्या तिबेट सीमाभागात अचानक आलेल्या महापुराने (Flash Flood) रौद्ररूप धारण केले असून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदी आणि त्रिशूली नदी पात्रात अचानक पाणीपातळी प्रचंड वाढल्याने तिमुरे, स्याफ्रुबेसी यांसारख्या सखल व बाजारपेठांच्या भागांना जलमय केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक इमारती, पूल आणि वाहने पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली आहेत.

मोठी जीवितहानी व शेकडो बेपत्ता:

प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याची नोंद असून शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे जवानही पुराच्या तडाख्यात बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

भारतीय पर्यटकांचा शोध सुरू:

नेपाळ टुरिझम बोर्डाच्या आकडेवारीनुसार, बेपत्ता असलेल्यांमध्ये १०५ हून अधिक भारतीय पर्यटक आणि ३७ अनिवासी भारतीय (NRI) यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचा मोठा गट संपर्काबाहेर गेला आहे.

पायाभूत सुविधा उद्ध्वस्त: सुमारे ११ हून अधिक जलविद्युत प्रकल्प, १९ पूल आणि अनेक मुख्य रस्ते पुराच्या पाण्याखाली गेल्याने किंवा वाहून गेल्याने काठमांडूशी जोडणारे संपर्कमार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दूरसंचार टॉवर्स आणि फायबर लाईन्सचे नुकसान झाल्याने मोबाईल संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली आहे.

युद्धपातळीवर बचावकार्य

नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक आपत्कालीन पथके शोध व बचावकार्यात तैनात करण्यात आली आहेत.अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर्स, अत्याधुनिक ड्रोन्स आणि श्वान पथकांची मदत घेतली जात आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी त्रिशूली येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रात तात्पुरते उपचार केंद्र उभारण्यात आले आहे.

भारतातील सीमावर्ती भागांना हाय अलर्ट

नेपाळमधील त्रिशूली नदी पुढे नारायणी नदीला मिळते आणि भारतात प्रवेश करताना ती गंडक नदी म्हणून ओळखली जाते. धरणांमधून आणि नदीपात्रातून पाण्याचा प्रचंड विसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारत सरकारने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांना विशेषतः महाराजगंज, कुशीनगर, पश्चिम चंपारण अतिदक्षतेचा (High Alert) इशारा जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) स्थितीवर लक्ष ठेवून सज्ज आहे.भारतासाठीही वाढला धोका
नेपाळमधील या महापुराचा परिणाम पुढे भारतातील नद्यांवर होण्याची शक्यता असल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही सतर्कता वाढवण्यात आली आहे.

नेपाळमधून येणाऱ्या पाण्यामुळे गंडक नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी सुरू केली आहे आणि बचाव यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

हिमनदीतील बर्फ-खडकांच्या ढिगाऱ्यामुळे महापुराचा अंदाज

प्राथमिक वैज्ञानिक विश्लेषणानुसार हा पूर केवळ मुसळधार पावसामुळे आलेला नसून हिमनदीतील बर्फ व खडकांचा मोठा ढिगारा कोसळल्याने नदीचा प्रवाह काही काळ अडला आणि त्यानंतर अचानक प्रचंड पाण्याचा लोंढा खालील भागात आला असण्याची शक्यता आहे.ICIMOD च्या तज्ज्ञांनी ल्हेंडे खोऱ्यातील या घटनेचा भोटेकोशी नदीवरील पुराशी संबंध असल्याचे सांगितले आहे.मात्र घटनेचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे.

रासुवा जिल्ह्यात सर्वाधिक विध्वंस

रासुवा जिल्ह्यातील स्याफ्रुबेसी, तिमुरे आणि भोटेकोशी नदीकाठच्या परिसराला मोठा फटका बसला. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यासोबत चिखल, दगड आणि मलबा वाहून आल्याने अनेक वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. काही ठिकाणी रस्ते व पूल तुटल्याने बचाव पथकांना प्रभावित भागात पोहोचणेही कठीण झाले आहे.

पुरामुळे नेपाळच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. नेपाळ विद्युत प्राधिकरणाच्या माहितीनुसार सुमारे ४३० मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण सुविधांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर

नेपाळ सरकारने बचाव आणि मदतकार्याला वेग दिला आहे. नेपाळ लष्कराने हेलिकॉप्टर आणि आपत्ती व्यवस्थापन पथके प्रभावित भागात तैनात केली आहेत. मात्र, काही भागांत पाण्याची पातळी आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरण्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठ सोडून सुरक्षित आणि उंच ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तिबेटमध्येही मोठे नुकसान

नेपाळच्या सीमेपलीकडे चीनच्या तिबेटमधील ग्यिरोंग भागातही पुराचा आणि भूस्खलनाचा मोठा परिणाम झाला.चिखलाच्या लोंढ्यामुळे रस्ते, दळणवळण आणि वीज व्यवस्था विस्कळीत झाली असून चीनच्या बाजूला किमान तीन मृत्यू आणि शेकडो बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

हवामान बदलाची गंभीर घंटा ?

हिमालयीन भागात हिमनद्या वेगाने वितळत असताना अशा प्रकारच्या हिमनदी-संबंधित आपत्तींचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अचानक येणाऱ्या फ्लॅश फ्लडमुळे पारंपरिक पूरपूर्व सूचना प्रणालींनाही मर्यादा येतात.त्यामुळे हिमालयीन प्रदेशात अर्ली वॉर्निंग सिस्टम,उपग्रह निरीक्षण, नदी पातळी मोजणी आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज या दुर्घटनेतून अधोरेखित झाली आहे.

नेपाळमधील बचावकार्य अद्याप सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. मृतांचा आणि नुकसानीचा अंतिम आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या समोर येणारे आकडे बदलू शकतात.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.