डोंगरगावात मागील भांडणाच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
डोंगरगावात मध्यरात्री मारहाणीचा प्रकार;एसटीपी पाईपने शेतकऱ्यावर हल्ला, चौघांवर गुन्हा
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगावात मागील भांडणाच्या रागातून ४६ वर्षीय शेतकऱ्याला एसटीपी पाईप व काठीने मारहाण केल्याचा आरोप.चौघांविरुद्ध गुन्हा दाखल;पोलिसांचा तपास सुरू
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १९ ऑगस्ट २०२६ : मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथे मागील भांडणाचा राग मनात धरून ४६ वर्षीय शेतकऱ्याला शेतात फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एसटीपी पाईपने तसेच काठीने मारहाण केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी दत्तात्रय मामा चौगुले वय ४६,व्यवसाय शेती,रा.डोंगरगाव,ता. मंगळवेढा यांच्या घरासमोर १६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
मागील भांडणाचा राग मनात धरून अभिजित मोहन चौगुले,सुशिला मोहन चौगुले, अजय मोहन चौगुले सर्व रा.डोंगरगाव आणि कोमल नवनाथ शिंगाडे रा.सांगोला यांनी संगनमत केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीतील माहितीनुसार, अभिजित चौगुले याने रात्री ८ वाजता माझा भाऊ अजय याला धक्काबुक्की का केली ? असा जाब विचारत शेतात फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एसटीपी पाईपने दत्तात्रय चौगुले यांच्या हातावर, पायावर आणि पाठीवर मारून त्यांना जखमी केले.
दरम्यान सुशिला चौगुले आणि कोमल शिंगाडे यांनी फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करून काठीने तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दत्तात्रय चौगुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ७६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात एसटीपी पाईप आणि काठीचा वापर झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट संबंधित न्यायालयात पाठविण्यात आला असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस नाईक दुधाळ (ब.नं. २०२) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करीत असून मारहाणी मागील कारणे आणि घटनेशी संबंधित इतर बाबींची चौकशी सुरू आहे.











Add Comment