ॲट्रॉसिटी प्रकरणात पत्रकार दत्तात्रय नवत्रे व ग्रामसेवक बसवेश्वर पाटील यांना दिलासा;पुराव्या अभावी गुन्ह्यातून नाव वगळले
मंगळवेढा महमदाबाद ॲट्रॉसिटी प्रकरणात पत्रकार दत्तात्रय नवत्रे व ग्रामसेवक बसवेश्वर पाटील यांची नावे पुराव्या अभावी वगळण्यात आली; न्यायालयाचा दिलासा.
सुमारे एक महिना जेल,अखेर सत्य समोर;मंगळवेढ्यात ॲट्रॉसिटी प्रकरणातून पत्रकार व ग्रामसेवकाची मुक्तता
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद (शे) येथील अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणात पत्रकार दत्तात्रय नवत्रे आणि ग्रामसेवक बसवेश्वर पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिस तपासात दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा पुरावा आढळून न आल्याने त्यांची नावे प्रकरणातून वगळण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रावर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून शेतात पोल रोवणे आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून ४ सप्टेंबर २०२१ रोजी मंगळवेढा पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार दत्तात्रय नवत्रे आणि ग्रामसेवक बसवेश्वर पाटील यांचीही नावे समाविष्ट करण्यात आली होती.

मात्र संबंधित दोघेही घटनास्थळी किंवा गावात उपस्थित नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांचे नाव राजकीय सुडबुद्धीतून गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे त्यांच्या बाजूने सांगण्यात आले.
पोलिस तपासात मोबाईल लोकेशनसह विविध पुरावे तपासले
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी केला. तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल लोकेशन,घटनास्थळावरील उपस्थिती तसेच संबंधित नागरिकांचे जबाब तपासण्यात आले.
तपासाअंती दत्तात्रय नवत्रे आणि बसवेश्वर पाटील यांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिद्ध करणारा पुरावा पोलिसांना मिळाला नसल्याचे नमूद करण्यात आले. त्यानुसार पोलिसांकडून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला.
ॲड.पांडुरंग चवरे यांचा युक्तिवाद
दोघांच्या वतीने ॲड.पांडुरंग चवरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्रातील मुद्दे मांडत त्यांना प्रकरणातून मुक्त करण्याची मागणी केली. पोलिसांनी सादर केलेल्या कलम 169 अनुषंगाने अहवालाचा आधार घेत न्यायालयासमोर दोघांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे मुद्दे मांडण्यात आले.
न्यायालयाने पोलिस अहवाल आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून पत्रकार दत्तात्रय नवत्रे आणि ग्रामसेवक बसवेश्वर पाटील यांची नावे सदर गुन्ह्यातून वगळण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात ॲड.पांडुरंग चवरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला.

सुमारे एक महिना न केलेल्या गुन्ह्यात जेल भोगली
या निर्णयानंतर पत्रकार दत्तात्रय नवत्रे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ते गावात उपस्थित नसतानाही केवळ प्रतिष्ठा मलिन करण्याच्या उद्देशाने आणि गावातील राजकारणातून त्यांचे नाव गुन्ह्यात गोवण्यात आले.
सुमारे एक महिना मी न केलेल्या गुन्ह्यात जेल भोगली. त्यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र पोलिस आणि न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर आले आणि आम्हा दोघांना या गुन्ह्यातून मुक्त करण्यात आले.सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं याचा प्रत्यय या प्रकरणातून आला,असे नवत्रे यांनी सांगितले.
या प्रकरणातील न्यायालयीन आदेशामुळे पत्रकार दत्तात्रय नवत्रे आणि ग्रामसेवक बसवेश्वर पाटील यांना दिलासा मिळाला असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.











Add Comment