डिजिटल फसवणुकीचा वाढता धोका; एका चुकीच्या क्लिकने गमावू शकता आयुष्यभराची कमाई
डिजिटल अरेस्टपासून UPI युपीआय फ्रॉडपर्यंत; एका चुकीच्या क्लिकने गमावू शकता आयुष्यभराची कमाई
तुमच्यावर गुन्हा दाखल आहे असा फोन आला तर सावधान! डिजिटल फसवणुकीचा धक्कादायक सापळा
डिजिटल फसवणूक,युपीआय UPI फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, OTP ओटीपी आणि ऑनलाइन स्कॅमपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? सायबर फसवणूक झाल्यास 1930 वर तक्रार करण्यासह महत्त्वाच्या सुरक्षितता टिप्स जाणून घ्या.
नवी दिल्ली|ज्ञानप्रवाह न्यूज : डिजिटल व्यवहारांनी दैनंदिन जीवन अधिक सोपे केले असले, तरी त्याचबरोबर सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या डिजिटल फसवणुकीचे प्रकारही झपाट्याने वाढत आहेत. UPI, इंटरनेट बँकिंग, सोशल मीडिया, बनावट गुंतवणूक योजना, फेक जॉब ऑफर, फिशिंग लिंक आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास देण्याचे प्रकार समोर येत आहेत.

भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने I4C डिजिटल अरेस्ट, UPI फ्रॉड, गुंतवणूक फसवणूक, बनावट नोकरी, फेक लोन ॲप आणि सोशल मीडिया जाहिरातींच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांना सातत्याने सावध केले आहे.
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने भीती निर्माण
सायबर ठग स्वतःला पोलीस, CBI, RBI, ED किंवा इतर सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवतात. तुमच्या नावावर गुन्हा दाखल असल्याचे सांगून व्हिडिओ कॉलवर चौकशी केली जाते. त्यानंतर ‘अटक टाळण्यासाठी’ किंवा ‘खाते तपासणीसाठी’ पैसे पाठवण्याची मागणी केली जाते.
I4Cच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनेनुसार ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही कायदेशीर संकल्पना भारतात अस्तित्वात नाही. कायदा अंमलबजावणी करणारी यंत्रणा डिजिटल पद्धतीने एखाद्या व्यक्तीला ‘अटक’ करत नाही.
UPI युपीआय आणि OTP ओटीपी फसवणुकीपासून सावध
तुमच्या खात्यात पैसे आले आहेत, KYC अपडेट करा,तुमचे बँक खाते बंद होणार आहे,रिफंड मिळवण्या साठी लिंकवर क्लिक करा अशा संदेशांमधून नागरिकांना फसवले जाते. काही वेळा बनावट ग्राहक सेवा क्रमांक किंवा सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करूनही ठग नागरिकांशी संपर्क साधतात.
OTP, UPI PIN, ATM PIN, CVV, पासवर्ड किंवा बँक खात्याची संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नये. UPI PIN युपीआय पिन हा पैसे मिळवण्यासाठी नव्हे, तर पैसे पाठवण्यासाठी वापरला जातो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
बनावट गुंतवणूक आणि नोकरीच्या आमिषाचा सापळा
सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲपवर आकर्षक परताव्याचे आश्वासन देणाऱ्या गुंतवणूक योजना, शेअर मार्केट टिप्स आणि बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. त्याचप्रमाणे घरबसल्या मोठी कमाई, पार्ट-टाइम जॉब किंवा कमी वेळेत जास्त पैसे मिळण्याचे आमिष दाखवूनही नागरिकांना पैसे भरण्यास भाग पाडले जाते.
I4C आय फॉर सी ने फेक CAPTCHA कॅप्चा जॉब आणि इतर ऑनलाइन फसवणूक प्रकारांबाबतही स्वतंत्र सूचना जारी केल्या आहेत.
फसवणूक झाल्यास घाबरू नका; तातडीने कारवाई करा
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न दवडता 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क करणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन तक्रार वरही नोंदवता येते. अधिकृत माहितीनुसार आर्थिक फसवणुकीसाठी 1930 ही सेवा उपलब्ध आहे.
सरकारच्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत Citizen Financial Cyber Fraud Reporting and Management Systemच्या माध्यमातून 23.02 लाखांहून अधिक तक्रारींमध्ये ₹7,130 कोटींपेक्षा जास्त रक्कम वाचवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
– अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
– OTP, UPI PIN, CVV ओटीपी, युपीआय पिन,सिव्हीव्ही ओटीपी आणि पासवर्ड कोणालाही सांगू नका.
– व्हिडिओ कॉलवर सरकारी अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ विश्वास ठेवू नका.
– तुमच्यावर गुन्हा आहे किंवा खाते बंद होईल अशा धमक्यांना घाबरू नका.
– गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनी, ॲप किंवा वेबसाइटची अधिकृत माहिती तपासा.
– सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲपवर मिळालेल्या ग्राहक सेवा क्रमांकाऐवजी संबंधित संस्थेच्या अधिकृत माध्यमातून संपर्क करा.
– फसवणूक झाल्यास पुरावे, स्क्रीनशॉट, व्यवहाराची माहिती आणि संबंधित क्रमांक जतन करून तातडीने 1930 वर तक्रार करा.

डिजिटल युगात सावधगिरी हीच सुरक्षा
तंत्रज्ञानाचा वेग थांबणार नाही आणि डिजिटल व्यवहारही भविष्यात आणखी वाढणार आहेत. त्यामुळे डिजिटल सुविधा टाळणे हा उपाय नाही; डिजिटल साक्षरता आणि सतर्कता वाढवणे हाच खरा उपाय आहे.
सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या भीती, लालसा आणि घाईचा फायदा घेतात. त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी काही क्षण थांबा, माहितीची पडताळणी करा आणि संशयास्पद वाटल्यास व्यवहार करू नका.
लक्षात ठेवा एक क्लिक करण्यापूर्वी विचार करा; कारण चुकीचा क्लिक तुमच्या खात्याबरोबरच तुमची वर्षानुवर्षांची कमाई धोक्यात आणू शकते.











Add Comment